नववे. या अशा परिस्थितीमुळें दक्षिणी मुसलमानांचें धर्मवेड बरेंच कमी झालें व त्यामुळें हिंदूंचा धर्मच्छलही फारसा आला नाहीं. जरी केव्हां केव्हां मुसलमानांच्या अंगीं पिसें येई, तरी त्यांणीं हिंदुधर्माची एकंदरींत फारशी अवहेलना केली नाहीं. त्यांच्या कारकीर्दीत हिंदूंस बरेंच धर्मस्वातंत्र्य होतें. लष्करी व दिवाणी अधिकारही हिंदूलोकांकडे मुसलमानी राजांनी बरेच सोंपविले होते. हिंदु देवस्थानांस ब-याच जमिनी इनाम दिल्या. हिंदु वैद्यांस दवाखान्यांतून जागा दिल्या व कित्येक ब्राह्मणसमाजास वंशपरंपरेच्या देणग्याही त्यांणीं दिल्या होत्या. तसेंच बरीच हिंदु कुटुंबें या मुसलमानी अमलांत नांवालैकिकास आलीं होतीं. १६ व्या शतकांत मुरारराव नांवाचा एक मनुष्य गोवळकोंडच्या राजाचा मुख्य प्रधान होता. गोवळकोंडच्या शेवटच्या राजाचा प्रधान मदन पंडित याचें इतकें वजन होतें कीं, याणें शिवाजी व गोवळकोंडचा राजा यांची दोस्ती करून देऊन मोंगलाबरोबर लढाई करण्यास त्यांस प्रवृत्त केलें. रामराय कुटुंबा चेंही गोवळकोंड च्या दरबारांत फारच चांगलें वजन होतें. प्रांताचा वसूल करण्याचें कामहो बहुधा या राजांच्या कारकीर्दीत ब्राह्मण देशपांडे व मराठे देसाई अगर. देशमुख यांनकडे असे. दादोपंत, नरसू काळे, एसू पंडित वगैरे ब्राह्मण त्यावेळीं फार नांवाजलेले होते. यांनीं विजापूरच्या मुलकी व्यवस्थेंत फार सुधारणा केली. गुजराथ व माळवा येथील राजांच्या दरबारीं अहमदनगरनें पाठविलेले वकील बहुधा ब्राह्मणच असत. पहिल्या बुराणशहाचे वेळीं तर सर्व सत्ता कमालसेन नांवाच्या एका ब्राह्मण प्रधानाचे हातीं होती. याच वेळीं विजापुरास एसू पंडित हा मुस्ताफ झाला होता. गोवळकोंड्यास अकाण्णामकाण्णा ह्या बंधुद्वयाचें इतकें वजन वाढलें होतें कीं, मोगलांनीं स्वारी केली, तेव्हां विनापूर दरबारनें यांची मदत मागितली.
दहावे. हळू हळू लप्करी खात्यांतही हिंदूंचें वर्चस्व वाढत गेलें. ब्राह्मणी राज्याचे वेळीं कामरान घाटगे, हरनाईक वगैरे हिंदु मनसबदार होते असें फेरिस्ता इतिहासकार म्हणतो. दुस-या ब्राह्मणी राजाचे शरीरसंरक्षक २०० शिलेदार होते. १६ व्या शतकाच्या आरंभीं वाघोज़ी जाधवराव नाईक नांवाचा एक मराठा सरदार व-हाड, विजापूर व विनयानगर या दरबारांत फारच प्रसिद्धीस आला होता. याणें कितीएक राजे पदच्युत केले व कितीएकांस राज्यपद प्राप्त करून दिलें. कर्नाटकांती : सर्व नाईकवाडी हिंदु फौजेचा हा मुख्य होता. वस्तुतः त्या काळीं है। एक बलाढ्य राजाच होता. त्याणें ते नांव मात्र धारण केलें नाहीं. प्रसिद्ध मुरारराव जाधव यानें १७ व्या शतकांत विजापूरची फारच उत्तम नोकरी बजाविली. विजापुरावर चालून आलेल्या मोगल लोकांचा याणें पराभव केला. हा व शाहानी भोसले हे विजापूर व अहमदनगर ह्या राज्यांचे आधारस्तंभच होते. मुराररावाचा -हास करण्याच्या कारस्थानांतही राघोपंत भोसले, घाटगे वगैरे हिंदूच अग्रणी होते. तसेच चंद्रराव मोरे व राजेराव या दोन मुराररावाच्या हाताखालील सरदारांनी कोंकण प्रांतांतील लढायांत फारच कीर्ति मिळविली होती. ह्यावेळीं ह्मसवाडचे माने, वाडीचे सावंत, डफळे व घोरपडे हे लोकही फार प्रसिद्धीस आले होते.