अशा प्रकारचें देशाचें नैसर्गिक स्वरूप. लोकांचा स्वभाव व संस्था असल्यावर तेथें परकीयांचा अम्मल फार दिवस कसा टिकावा ? महाराप्ट्रीयांच्या इतिहासावरून वरील नियमाची यथार्थता तेव्हांच व्यक्त होते. हे लोक नात्याच स्वातंत्र्यप्रिय असल्यानें, जरी कांही प्रसंगी त्यांस परकीयांची गुलामगिरी करावी लागली, तरी पुनः त्यांनी आपलें स्वातंत्र्य स्थापित करण्यास कधींही सोडले नाहीं. महाराष्ट्रावर कोणत्याही एका राजसत्तेचा अंमल फार वेळ कधींच टिकला नाहीं. हिंदुस्थानचे इतर भागांत बरीच एकछत्री राज्ये अस्तित्वांत असल्याचें आढळतें. महाराष्ट्रांत मात्र तशी स्थिति नाहीं. तेथें लहान लहान स्वतंत्र संस्थानिकांचाच अंमल फार दिसतो. एकछत्री अंमल चालू न देण्याबद्दल त्यांची सतत खटपट चाललेली दिसते. व्यक्तिस्वातंत्र्य या लोकांस जरी विशेष आवडे, तरी उत्तरकडून आलेल्या शत्रूस पादाक्रांत करण्यास एक जुटीनें ते नेहमीं तयार असत. ख्रिस्तीशकाच्या आरंभीं शातवाहन किंवा शालिवाहन राजानें सिथियन लोकांचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. पुढें ६ ० ० वर्षानी चालुक्यवंशीय पूलकेशी राजानें त्यांचा पुनः पराभव केला. महाराष्ट्रांत लहान लहान राज्यें व संस्थानिक फार होते. शिलालेख, नाणीं, ताम्रपट वगैरेवरून जी माहिती मिळते. त्यावरून या देशांत राजसत्ता वरचेवर पालटत गेल्याचें दिसतें. नगर, पैठण, बदामी, मालखेड, गोवें, कोल्हापूर, कल्याणी, देवगिरी, दौलताबाद हीं एकामागून एक चालुक्य, राष्ट्रगुप्त व यादव राजांची राजधानीचीं शहरें झालीं. चाणुक्य, नलवडे, कदम, मोरे, शेल्लार, अहिर आणि यादव यांमध्यें स्वतःचें वर्चस्व स्थापण्याबद्दल सारखे तंटे सुरु होतें. मुसलमानांचे हातीं हा देश जाईपर्यंत अशी स्थिति चालली होती. सुमारें १४ व्या शतकाच्या प्रारंभास मुसलमानांनीं या देशावर स्वा-या करण्यास सुरवात केली
यापूर्वी २०० वर्षे उत्तराहिंदुस्थानांत मुसलमानांनी आपली सत्ता बसविली होती. मुसलमानांस सर्व देश जिंकण्यास ३० वर्षे लागलीं. पश्चिम महाराष्ट्र व कोकणांत तर त्यांची सत्ता बहुतेक कधींच कायम झाली नाहीं. पंधराव्या शतकाच्या शेवटी कोंकण त्यांच्या हातीं गेले. परंतु मावळ किंवा घांटमाथा त्यांनी कधींच जिंकला नाहीं.
मुसलमानी अमलामुळें ह्या प्रदेशांतील लोकांच्या रीतीभातींत किंवा भाषेंत मुळींच अंतर पडलें नाहीं. हा प्रदेश बहुतेक हिंदुकिल्लेदारांच्या हातीं होता. येथील लोकसंख्येंतही फारसा फरक झाला नाहीं. फारच थोडे मुसलमान इकडे कायमचे येऊन राहिले. हल्लींही लोकसंख्येंत मुसलमानांचें प्रमाण फारच कमी आहे. महराष्ट्रांत मुसलमानी राजसत्तेस कायमचें स्वरूप कधींच आलें नाहीं. उत्तर व पूर्व हिंदुस्थानांत मशीदी व थडगी यांचे प्राबल्य फार वाढलें. हिंदुदेवालयें नाश पावली व हिंदूंस उघडपणें पूजाअर्चा करण्यासही पंचाईत पडूं लागली. लोक नेहमीच्या घरच्या व्यवहारांतही मुसलमानी भाषा वापरूं लागले. उडदू भाषाही तेव्हां पासूनच अस्तित्वात आली. उत्तरेकडे जरी अशी स्थिति झाली, तरी महाराष्ट्रांत हा अनुभव मुळीच आली नाही. मुसलमानी अमदानींतही हिंदु धर्म आणि भाषा यांची सररहा येथें प्रगतीच होत गेली. महाराष्ट्रांतच अशी स्थिति कां झाली व मुसलमानी सत्ता झुगारून देऊन हिंदूनी आपला अमल हळू हळू कसा बसविला, याचा आतां आपण विचार करूं.