फेरोकशर बादशाहा सयदाचे आश्रयानें पदावर बसला. ते उभयता सय्यद आपल्यास डोईजड होतील तरी बळहीन करावे असे मनांत आणून त्यापैकी सय्यद हुसेन यास दक्षणचा अधिकार देऊन पहिला अधिकारीयास गुप्त लिहून पाठविलें की याचे हवाली अंमल करूं नये. त्यावरून दक्षणचा अधिकारी दाऊदखान व सय्यद यांची लढाई होऊन दाऊदखान मयत झाला. तो दाऊदखान गुजराथचा यावेळी अधिकारी होता. सय्यद हुसेन अल्ली यास दक्षणसुभा प्राप्त झाल्यावर खंडेराव दाभाडे गुजराथप्रांती बंड करीत होता.७ त्याचे पारपत्यास गेला तेथे त्याशी लढाई होऊन सय्यदाचा पराभव झाला. त्याची वस्त्रेंसुध्दा दाभाड्यानें लुटून घेतली. असा जय खंडेराव याणीं मिळवून साता-यास शाहू महाराजास भेटला. तेव्हां शाहू महाराज संतोष पावून त्यास सेनापतिपद देऊन गुजराथचा व काठेवाडचा अंमल त्यांनीं बसविला, त्याचा सुभाहि त्याजकडे सांगून दरमहा व हुजूर खर्चास ऐवज देत जावा व फौज बाळगावी व थोरले महाराज धान्य व नक्त श्रावणमासी धर्मादाय देत असत तो सेनापति यांनी आपल्या तालुक्यापैकी दोन चार लाख रुपये खर्चून कोटिलिंगे ब्राह्मणांकडून करवीत जावीं असें ठरलें. पहिला सेनापति मानसिंग मोरे त्या पदास योग्य नाही ह्मणून दूर केला. स्वारीस निघोन कुटुंब बराबर असता मूळा नदीवर गेले. तेथे मौजे हिंगणगाव ता. पाटस येथे दमाजी थोरात८ पुंड होता. त्यानें भेटीस ह्मणून बोलावून घेऊन कुटुंबासह अंबाजीपंत पुरंधरे यांस अटक करून बाळाजीपंतावर निकर्ष करूं लागले. तेव्हा अंबाजीपंतांने निकर्ष सोसून खंडाचें बोलणें केले. द्रव्य द्यावयास नाहीं, तेव्हा सौभाग्यवती मातोश्री९ राधाबाई व पुत्र बाजीराव व चिमाजी अप्पा तेथे ठेवून खासे निघाले. तेथे मोरशेट करंज्या होता. तो लाह्यांचे लाडू करून देत होता. त्याचा पुत्र धनशेट करंज्या याचें सरकारांतून चालविलें. स्वारी २७, साबान.