लेखांक २०२. १७०३ मार्गशीर्ष शु॥ ३.
पो। छ १ माई श्रीशंकर प्रसन्न. १८ नोव्हेंबर १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णरावतात्या स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य गंगाधरराव भिकाजी साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ ४ जिल्हेज मुकाम पुणें जाणोन स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. विशेष. आपण अश्वीनशुद्ध चतुर्थीचें पत्र पाठविलें, तें पावोन बहुत संतोष जाहला. नवाबबहादुर यांचें व इंग्रजाचे लढाईचा मजकूर व माहागाई .... .... ........ ....लिहिला तो कळों आला. ऐसेंच सदैव पत्र पाठवीत जावें. यानंतर आह्मी गुजराथेंतून पुणियास आलों. फौजेस नालबंदी देऊन रामतीर्थास गेलों होतों. त्यानंतर फौजसुद्धां येणियाविषयीं सरकारचीं पत्रें आलीं त्याजवरून फौज जमा करून फौजसुद्धां मुकाम मजकुरास आलों. यानंतर सरकारची आज्ञा होईल तिकडे जावयास येईल. वरकड सविस्तर मजकुराचीं पत्रें तीर्थस्वरूप राजश्री आणासाहेबांचीं येतच आहेत. त्याजवरून कळतच आहे. निरंतर पत्र पाठवून सानंदवित गेलें पाहिजे. सविस्तर मजकूर तीर्थस्वरूपाचे पत्रावरून कळेल. सदैव पत्र पाठवित जावें. बहुत काय लिहिणें कृपा लोभ करीत जावें हे विनंति.