पो। छ १५ जिल्काद लेखांक २०१. १७०३ अश्विन व॥ १.
सन इसन्ने समानीन. श्रीभार्गवराम. ३ आक्टोबर १७८१.
चिरंजीव राजश्री तात्या यांसीं प्रति चिंतामण दीक्षित व आबा दीक्षित आशिर्वाद उपरि येथील कुशल त।। आश्विन वा। १ जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असावें. विशेष. तुह्मी येथून गेलि(या) ता। तीन चार पत्रें व हल्ली शिवकंचीचें मुकामचें ऐसीं पाठविलीं, तीं पोहोंचून संतोष जाहला. मार्गीं महदरिष्टाचा उपद्रव जाहल्याचीं पत्रे आलीं; त्यावरून चिंता प्राप्त आज ता। जाहली होती. ते हल्लींच्या पत्रावरून निवारण जाहली. आह्मी दोन तीन पत्रें पाठविलीं तीं पोंहचलीं किंवा नाहीं हें न कळे. सांप्रत इकडील विशेष ल्याहावें ऐसें नाहीं. वाडियांतील व सर्व सुखरूप आहेत. वरकड मजकूर राजश्री गणेशफ्तं यांनीं लि॥ आहे यावरून कळेल. इकडील कोणे गोष्टीविषयीं चिंता न करावी. तिकडील मसलतीचा अर्थ सिद्धतेंत आणोन, नवाबबहादुर यांची मर्जी रक्षून, दोहींकडील मसलतीचा बंदोबस्त करून श्रीचे उत्साहास जरूर यावें. मागती नवाबाचे मर्जीनरूप जाणें तरी जावें. नवाब फार मेहरबानी करितात ह्मणोन लिहिले, त्यास आपणही त्यांचे ठिकाणीं एक लक्षानेंच चालतां; त्यापक्षीं ते मेहरबानी करितील. तेही सर्व परीक्षक आहेत. आपण त्यांची मर्जी रक्षून यावें. नित्य अहोरात्र श्रीची प्रार्थना करीत आहों. श्री सर्व मनोदयानुरूप घडवील. चिंता किमपि करूं नये. युद्धप्रसंगास सावधगिरी तुमची असावी. किती ल्याहावें. सर्वांचे नेत्राचें लक्ष तुह्मांजवळ आहे. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति.
राजश्री विनायकपंत व बाळाजी व गोपाळपंत यांसी नमस्कार.
लोभ कीजे. तुह्मीं चिरंजिवासमागमें आहां. युद्धप्रसंगास रात्रंदिवस जपत जावें. आळस नसावें. विशेष काय ल्याहावें, तुह्मी सुज्ञच आहां हे विनंति.
वे॥ राजश्री बाजी भटजी यांसी नमस्कार विनंति उपरि श्रीदेवाचे पुजेस व अनुष्ठानास फार जपोन असावें. त्यांत सर्व यश आहे हे विनंति.