पो। छ १५ जिल्काद लेखांक १९९. १७०३ अश्विन व॥ १.
सन इसन्ने समानीन. श्रीशंकर. ३ आक्टोबर १७८१.
सेवेसी गणेश नारायण सां। नमस्कार विनंति येथील वर्तमान ता। अश्विन व॥ १ मु॥ रुषिग्राम यथास्थित असे. विशेषः- आपणांकडील पत्रें श्रीशिवकांचीचे मुकामचीं व पहिलीं दोन तीन आलीं, तीं पोंहचून आनंद जाहला. मजकडून त्या पत्राचीं उत्तरें, एक राजश्री यशवंतराव यांचे माणसासमागमें व एक भवानजी चिकणे व एक राणोजी जासूद एकूण तीन पत्रें तपशीलवार पाठविलीं तीं पोंहचलींच नाहीं. त्यावरून सेवेसीं अंतर पडलें. याउपरि पत्रें पाठविणें तीं राजश्री गोविंदभट तात्या यांजकडे पाठवीत जाईन. ह्मणजे सेवेसीं पोंहचतील. इकडील मजकूर तरी, वर्णीविसीं आज्ञा होती त्याप्रों।च चालत आहे. राजश्री कृष्णाजीपंत ढेकणे यांजकडील पूजाबाबत जाबसाल उगवून घेतला. जमाखर्च झाडून होत आले, एकसालचे व किरकोळ राहिले आहेत, तेही आठचार रोजांत होतील. मला घरास जावयासी बनलें नाहीं. सर्व कामाचा बंदोबस्त करून कार्तिकमासीं जाईन. मामलती बाबत दुसाला हिसेब करून घेतले. मौजे उले पा। सोलापूर हा गांव साल गु॥ बद्दल दु॥ देऊन सनदा दिल्या, त्या सुभेदारास लाविल्या.
त्याणीं न मानिल्या ह्मणोन मागतीं सरकारचीं ताकीद पत्रें व श्रीमंत यजमान स्वामींचें खासगत पत्र पाठविलें तेंही मानिलें नाहीं. उत्तर केलें कीं, सरकारांत आमचा करार आहे कीं, गांव कोणांस द्यावयाचा नाहीं. सनद आली तरी गांव देंऊ नये ऐसीच श्रीमंतांची आज्ञा आहे. त्यावरून मागतीं चिरंजीव राघोबास पत्र लिहून गोविंदभट तात्यांस लिहून पाठविलें, तेथून उत्तरच न होय. मग जासूद उठोन आला. एक दोन रोजां मीच जाऊन बंदोबस्त जाहल्यास करून घेतों. तो कामाकाजाविसीं मुख्यास वेदमूर्तीस निक्षून लिहिलें पाहिजे. निंबाळकरांकडील वरातेचाही ऐवज येत नाहीं. असो. येक वेळ जाऊन पाहतों. काम जाहल्यास करून घेतों. सर्व मजकूर आपले लि॥ वर आहे. राणोजी जासूद याजबराबर खासे कागदांचा दस्ता एक व तपकील बेलें भरून पाठविलें तें पोंहचलेंच असेल. तेथील मसलतीचा गुंता उरकून श्रीशिवरात्रीचे उच्छाहास येणें जरूर जाहलें पाहिजे. तेथील युद्धाचा प्रसंग आहे. सावधगिरी ध्यानांत आहेच. आपले सैन्यांत मरीचा उपद्रव जाहल्याचीं पत्रें आलीं. त्यांतच हीं पत्रें येत, तो कोणाची चित्तवृत्ति ठिकाणीं नवती. काल पत्रें आलिया पा। सर्वांस आनंद जाहला. सदैव पत्रीं सांभाळ जाहला पाहिजे. इकडील सर्व बंदोबस्त आज्ञेप्रों। आज तागाईत आहे. राजश्री आपांस सांगितल्याप्रमाणें पावतें केलें. मजकडील गु॥ बाबत रकमेचा जमाखर्च आज्ञेप्रमाणें करितों. येथील सरकारी अधिकारी आहेत यांसीं पत्रें येत जावीं व सुभेदार यांसही ल्याहावें. ते वारंवार स्मरण करीत असतात. श्री विंध्यवासिनी देवीचा पाटाऊ व चोली व दक्षणा चिंतामण दीक्षित चितळे यांचे पुत्रांबराबर रवाना करून दिल्हे. साल गु॥ बाग घेतला त्यांत चारशें केळीं व कांहीं फुलझाडें व हजार बाराशें तुळसी, येणें प्रमाणें तूर्त करविलीं आहेत. सारांश, तेथील मसलतीचा ठराव होऊन नवाब बहादूर यांची आज्ञा घेऊन लवकर येणें होय तें जाहलें पाहिजे. येण्याचे सुमारें आगोदर सूचना यावी ह्मणजे सरंजाम करून ठेवावयाचा तो करून ठेवीन. बहुत दिवस राहण्याचें न करावें. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
राजश्री बाळाजीपंत दाजी व गोपाळपंत दाजी व बाजीभटजी गुरुजी स्वामींचे सेवेसीं सां। नमस्कार विनंति लोभ करावा. आपले घरींचीं सर्व सुखरूप आहेत व वो। राजश्री रामभटजी बापट यांचेही घरींची सर्व सुखरूप आहेत. कळावें लोभ करावा हे विनंति.
सेवेसीं धोंडोराम कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना ऐसिजे. आज्ञेप्रमाणें वर्तणूक होत आहे, निवेदन होणें हे विज्ञापना.