पो। छ १७ साबान लेखांक १९२. पो। १७०३ श्रावण व॥ ४.
सन इसन्ने समानीन. श्रीनिवासो जयति. ८ आगष्ट १७८१.
सेवेसीं विज्ञापना कालीं आज्ञा घेऊन निघालों ते अस्तमानीं उतरमटुरास येऊन पावलों. आजी तेथेंच प्रातःकाळीं भोजन करून येथें लष्करांतून तीन कोसांवर येतांच राजश्री रावजीची जोडी आली. ह्याबदल परवाना आमचे नांवचा होता, तो घेतला. त्यांत लिहिलें आहे कीं सर्वत्रांस कंचीच्या मैदानांत उतरवून तुह्मी हजूरास येणें ह्मणून लि॥ आहे. विदित होय. सरकारचा लाखोटा होता तो रात्रीं पाऊस आला ह्मणोन जासूदांनीं रवळोपंताकडे दिल्हा होता. तो त्यांनीं फोडून पाहून पुन्हा गोंद लावून आह्मांकडे पाठविला. त्या लाखोट्यांत काय आहे ह्मणून पाहिलें असेल. अथवा हजरताची आणखी कांहीं चिटी होती हेंही कळेना. सर्वही हजुरास गेल्यावर कळेल. दुस-याचा लाखोटा फोडून पहाणें, हे गृहस्थपणाची सीमा आहे. आजी हजूरास गेल्यावर, सर्व अर्ज करून उदियां जोडी सेवेसीं पाठवितों. हजुरांतून काय हुकुम होईल त्याप्रमाणें लेहून पाठवितों. बहुत काय लिहिणें लोभ करावा. हे विनंति.