पै॥. छ ६ साबान सन इसन्ने. लेखांक १९१. १७०३ श्रावण शु॥ ८.
समानीन मया व अलफ. श्रीगुरु. ६ जुलई १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। जनार्दनराव शिवराम कृतानेक सां।। नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल ता। श्रावण शुक्लाष्टमी मुकाम कालहास्ती येथें आपले कृपेंकरून सहमडंळी स्वस्ति क्षेम जाणून स्वानंद ल्याहावें. विशेष. आह्मी आपला निरोप घेऊन गुरुवारीं निघालों, ते भृगुवारीं प्रहर दिवसास स्वस्थळास येऊन पावलों. आपलीं पत्रें वगैरे जासूद घेऊन जासूद दोन प्रहरां पावला. कागद व जायफळें त्यांनीं पाठविलीं तीं पावलीं. पालेगारांनीं लबाडकी केली, करितां तो रस्ता सोडून रायवलचेरुचे वाटेनें गेलों. ह्मणून तरी राजरस्त्यास पालेगाराचे बापाचें काय गेलें. मादरचोदीस आले असतील. असो. आपणासह फौज शीघ्र नवाबबहादुरांचे फौजेस दाखल व्हावें. नवाबसाहेबही मुखालफीचा पिच्छा करित करित नजीक आले, तें वर्तमान आपणास तपशीलें पुढें कळेलच. आह्मीं येथें आलियानंतर मुखालिफाचें वर्तमान नेयूराहून आलें फिरंगी सरदार बंगालेहून आला. त्यासमागमें दाहा हजार बार घेऊन नेयूरास आला. नेयूरचे चार हजार बार आणि बंगालचे चार हजार प्यादा. शिवाय तेथें व्यंकटगिरी ह्मणून पालें आहे. ते पालेगार नवाबसाहेबांस आहेत. त्यांचें मकान वगैरे साफ केलें. यास्तव पालेगार मजकूर जंगलांत छपून होते. त्यांजकडील प्यादे तीन हजार मुखालि. फाकडे कुमकेस गेले. एकूण चवदा हजार बार व पांचशें फिरंगी व सातआठ हजार प्यादे इतके जमियेतेनिसीं निघोन मैदानांत येऊन उतरले आहेत. त्याचा कस्त नीट निघोन दर्यायकिनारायानेंच जाऊन जरनल कुटास मिळावें ह्मणावयाची तजवीज केली आहे. आणि आसपास मुलकांत दौड पाठवून बैल बकरीं वगैरे जनावरें हाकून घेऊन गेले. कुटाचेंही मानस आहे. जे नेयुराकडे फौज आली तीस मेळवून घ्यावें, ह्मणून एक एक कदम इकडेच सरकत येतो. पुढें पहावें. ईश्वरदयेनें मुखालिफाचें तंबीचें वृत्त ऐकिल्यास लिहिजेल. मुख्य बंगाल्याकडील व मच्छलीबंदराकडील मुलुख ताराज होऊन, जेव्हां चहूंकडील रसद बंद होईल, तेव्हां सहजच पादाक्रांत होऊन येतील. जंवर मकरी लोकांस दोन ... ......नीट आहेत, तवपावेतों कुमकेची व रसदेची उमेद खुषकीची आहेच. यांस पश्चम धरून बंगाल्यापलीकडे खुष्कींत समुद्रतीरीं एक दाणा न मिळावा ऐसें केल्यास थोड्याच दिवसांत शत्रु निर्नाम होईल. नाहीं तरी दिवसगती लागेल. यास्तव उभय मुलुक दोन बाजू शत्रूस ते बाजू तोडावयाची तजवीज कशी ते करावी. आणि आपणाकडील वृत्त तपशिलें वरचेवरि लिहित जावें. आपले कागदपत्र शीघ्रच रवाना होतील. आमचींही पत्रें तयार जाहलीं असत. भुजंगराव यांचा होन पाठविला असे. पावलियाचें उत्तर पाठवावें. नवाब साहेबांस आह्मीं अर्जी लिहिली ते वस्त्रें गुजराल, ते समयीं प्रविष्ट करावी. आह्मांकडे पत्रें यावयाविसीं पाहिजे तरी नवाबास पुसून आंचीवरी पाठवीत जावीं. लोभ असावा. आपण सर्वज्ञ तेथें विस्तारें लिहिणें नलगे. हे विनंति.