लेखांक १९०.
१७०३ आषाढ व॥ १. श्री. ६ जुलई १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या जोसी यांप्रतिः-
स्नेहाभिलाषी सदाशिव दीक्षित ठकार वाजपेययाजी आशिर्वाद विनंति उपरी. येथील कुशल ता। आषाढ वद्य १ जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आपणांस जाऊन सवा वर्ष जाहलें. गेलियानंतर एक पत्र पाठविलें, तें पोष मासीं पावोन, साकल्य वर्तमान कळोन, बहुत आनंद जहाला. असेंच आपलेकडील साकल्य कुशलवृत्त लेखन करून संतोषावाप्ती करावी. त्या पत्राचें प्रतिउत्तर आह्मीं पूर्वीं पाठविलें, तें प्रविष्ट जहालेंच असेल. अलीकडे आपणांकडून पत्र येऊन वर्तमान कळलें नाहीं, त्यावरून चित्त सापेक्षित असे. तरी आपलें स्वकुशलवृत्त साकल्य लेखन करीत जावें. जाऊन बहुत दिवस जहाले आहेत. श्रीमंतांची आज्ञा होईल त्याप्रों। नबाब यांची आज्ञा घेऊन यावयाचें करावें. शरीर तुमचें बळाढ्य नवे. तिकडील पाणी मानणार नाहीं. यास्तव शरीर बहुत रक्षित जावें. स्वामिशेवेचे यश संपादून यावें. आपले स्वस्तिक्षेम कुशळ लेखन करावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असों द्यावा. हे आशीर्वाद.
हे॥ नारायण दीक्षित व यज्ञेश्वर दीक्षित यांचे आसीर्वाद. आपलें कुशलवृत्त अलिकडे कळत नाहीं, यावरून चित्त उद्विग्न आहे. तर कुशल साकल्य लेखन करावें, तेणेंकरून संतोष होईल. मुख्य, शरीराविषयीं त्या प्रांतांत उदक वाईट यास्तव, रक्षणास्तव सावध असावें. भेट होईल तो सुदिन असे. लोभ करावा. हे आसीर्वाद.