पै॥ छ २२ जमादिलावल सन लेखांक १८७. १७०३ वैशाख वद्य ९.
इहिदे समानीन. मुकाम पडसाळी श्रीगणराज. १६ मे १७८१.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णरावतात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। केसो आपाजी कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त।। छ २१ जमादिलावल जाणून स्वकिय लिहित असलें पाहिजे. विशेषः-मौजे कारजोळ यासी वेढा राजश्री परशरामपंत भाऊ यांजकडील फौज येऊन वेढा घातला आहे. त्यास, तो गांव देशपांडे यांचा, त्यांत गृहस्त रा॥ सखारामपंत देशपांडे ह्मणून आहेत, त्यांचा आमचा स्नेह आहे. याजकरितां राजश्री आनंदरावजीस पत्र पाठविलें आहे. तरी या कामांत आपण पडोन त्याचें ठाणें त्याजकडे राखावें. त्यांचा भाउबंदीचा कजीया आहे, तो आमचे विद्यमानें करावा. ऐसें जाल्यास, श्रीमंत राजश्री नाना रास्ते कोरजोळावर मागें आले होते, त्यांत आह्मी पडोन तोडजोड केली होती, त्याप्रो। हाही बीद बसवून देऊं. तेव्हां तोडमोड कैसी जाली ह्मणाल, तरी तो मजकूर राजश्री आनंदरावजींस विदित आहे. हा सर्व प्रकार ध्यानांत आणून आपले खातरजमेचें पत्र आलें, तरी आह्मी या कामांत पडूं; नाहीं तरी पडणार नाहीं. वरकड मजकूर र।। बापूजी गोविंद सांगतां कळेल. वरकड आता आपण थोर कामांत पडिले आहेत. पूर्ण ममता असावी. भेटीचा हेत होता, परंतु भेट होईल तो सुदिन असे. कागदींपत्रीं तरी दर्शनाचा लाभ देत असावें. चार मुकाम करून कारजोळाकडे येत असल्यास तो गृहस्थ वेढ्यांत आहे त्याजकडे युक्तिप्रयुक्तीनें चिटी पाठवून, त्याचाही पका जाबसाल मनास आणून, पत्र आपलें आलें, ह्मणजे यांत आह्मी पडूं, व आपलेंही इकडे येणें होईल. भेटही होईल. आणखीं कितीक जाबसालही बोलावयाचे आहेत. सारांश, आपले पत्राचें उत्तर आलें ह्मणजे यांत आह्मी पडतों, नाहीं तर नांव घेत नाहीं. आपली भेट होती तरी उत्तम होतें. कितीक बोलणें होतें. भेट होईल तो सुदिन, लोभ करावा हे विनंति.