पो। छ १७ जमादिलावल लेखांक १८६. १७०३ वैशाख व॥ ५.
सन इहिदे समानीन. श्री. १२ मे १७८१.
राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं :--
सां। नमस्कार विनंति. स्वामींनीं पत्र पाठविलें तें पावलें. आथणीस आपलें येणें जालें, हें वर्तमान राजश्री अंबानीं आह्मांस काल लिहिलें होतें. आज स्वामींचें पत्र आलें, त्यावरून कळलें. आपली मार्गप्रतीक्षा करीतच होतों. श्रीमंत यजमान स्वामींचीं पत्रें वरचेवर येतात कीं, बागलकोटास जाऊन लौकर पोहंचावें, मागाहून राजश्री गणपतरावजीचें येणें जालीयावर बागलकोटाहून परतूं नये, जावें; ऐसीं पत्रें येतात. मी गांवास जाऊन गांवीहून निघालों ते श्रीपंढरीस राजश्री कृष्णाजीपंत फौजसुद्धां आले होते, त्यांस येऊन मिळालों. आजपर्यंत बागलकोटास गेलों असतों. परंतु आपली मार्गप्रतीक्षा करून सलगरेयासीं आठ चार मुकाम करून, श्री रामतीर्थास येऊन, श्रीमंत सौभाग्यवती मातुश्री बाईंची भेट घेऊन, काल श्री तीरास आलों. आपलें पत्र आलें, त्याचा मजकूर कळला. त्यास, उदियाचा दिवस आमची मुकाम येथें आहे. सोमवारीं दिवस चांगला आहे. नवें निशाण करविलें आहे व मजला डेरियासी जाण्याचा मुहूर्त आहे. सुदिवस पाहून डेरियास जावें. लष्करासमीपच रहातों. फार अंतरानें रहातों. त्यास, सोमवारीं दिवस चांगला आहे. निशाण नवें करविलें आहे. त्याची पूजा करून, हत्तीवर निशाण घेऊन, दोन कोस सूरपालचे समीप मुकाम करावा, ऐसें आहे. त्यास, आपण कूच करून लौकर यावें. आदिला एक मुकाम आपलियाकरितां करितों. आपण आह्मीं एकत्र जालियावर श्रीकृष्णा पार होऊन, दर मजल बागलकोटास जाऊं. तेथें गेलियावर राजश्री गणपतरावजींची वाट पाहूं. ते बागलकोटाचे मुकामास आलियावर मगवलीस कूच करून जाऊं. याउपर दिवसगत न लावावी. दरबारीं श्रीमंत राजश्री नानांची मर्जी आपलियासी विदित आहे. मजला श्रीमंत यजमानस्वामींचीं पत्रें वरचेवर येतात. याउपर आपण आमचा गुंता कांहीं न करावा. दिवस कशास लावावे ? लोभ करावा. हे विनंति.