लेखांक १७१.
१७०२ आषाढ व.९. श्री. २५ जुलई १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं गजिंद्रगडचे मुकामचीं पत्रें पाठविलीं तें पावलीं. मजकूर समजला. खजान्याचे वोझ्यास नवाबाकडील बैल आहेत, ते बागडकोटास पोंहचाऊन माघारे जाणार, त्याजकरितां सरकारांतून वोझ्यास बैल व उंट व गाडदीस्वार पाठवावे, ह्मणोन लिहिलें. त्यास, तुमचे लिहिल्याप्रमाणें वोझ्यास सरंजाम उंटें व स्वार व गाडदी ऐसे रवाना केले. ते आथणीस राहून तुह्मांस पत्र लिहितील. तुह्मीं बागडकोटाहून नपीन्या घांटास उतरणार, तेथें उंट वगैरे सरंजाम बोलावून घ्यावा. बागडकोटाहून नदीपर्यंत पोंहचावून देण्याविशीं राजश्री यशवंतराव दि॥ रास्ते यांस लिहिलें आहे; व रास्ते यांचेंही पत्र मशारनिलेस अलाहिदा पाठविलें आहे. तेथील सरंजाम घेऊन नदीपावेतों यावें. अलीकडे इकडील सरंजाम आहे. उंटें इकडील अलीकडील तीरींच असों द्यावीं; पाण्यांत न घालावीं. र॥* छ २२ रजब. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति. तुह्मीं नवाबबहादर यांपासून निघाल्यावर दोन तीन रवानग्या पत्रांच्या पाठविल्या त्या पावल्या. लिहिले अर्थ सविस्तर कळले. हे विनंति.
पो। छ ४ साबान, इहिदे सबैन (?) श्रावण. पुरवणी सुद्धां बंद २.