लेखांक १७०.
१७०२ आषाढ व॥९. श्री. २५ जुलई १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. राजश्री माहादजी सिंदे यांजकडील निभावणीचें पत्र बागडकोटास हुजरे याजबराबर पाठविलें. तें वर्तमान नूरमहमदखां यांस कळतांच संतोष होऊन, नवाबास लिहीत होते. परंतु आमची खातरजमा न पटली. पत्रांत काय मजकूर आहे न कळे. सबब, मोठे युक्तीनें नवाबास पत्र ल्याहवयाचें रहाविलें. ह्मणोन तपसिलें लिहिलें. ऐसियास, सिंदे यांचें पत्र येथें पाहून बागडकोटास रवाना केलें. त्यांत रतीमात्र दिकत नाहीं. मसोद्याबरहुकूम आहे. तुह्मीं नूरमहमदखां यांस सांगून खातरजमेनें ल्याहावें. बागडकोटास तुह्मी पोहंचून पत्र पाहिलेंही असेल. पत्राविशींची दिकत राहिली नाहीं. लांब लांब मजली करून सत्वर यावें. र॥ छ २२ रजब. हे विनंति.