पो। छ ४ साबान लेखांक १६९. १७०२ ज्येष्ठ व॥१२.
मु॥ तंगलबगी. श्री. २९ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. राजश्री महादजी सिंदे यांचें पत्र निभावणीचें आलें तें सरकारचे खिजमतगार व कासीदजोडी बराबर तुह्मांकडे र॥ केलें. तों तुमची रवानगी नवाबहैदरअलीखान बहादर यांणीं केली ह्मणोन नवाब मशारनिलेचें पत्र येथें आलें. त्याजवरून खिजमतगार व कासीदजोडीनीं बागलकोटास रहावें ह्मणोन सरकारचें पत्र पाठविलें आहे. त्याप्रमाणें ते तेथें राहतील. तुह्मी तेथें आल्यानंतर लाखोटा फोडून व निभावणीचें पत्र थैलींत आहे. त्यास, थैलीचा सिका लाखोट्याचा जाया न होतां थैली फोडून त्यांतील मजकूर निभावणीचें पत्रांतील पाहून, फिरोन थैली करून तुह्मीं येतेसमयीं नवाबबहादूर यांचें काय बोलणें जालें असेल त्या अन्वयें पत्र तिकडें पाठवावें. राजश्री पाटीलबोवांचें निभावणीपत्र आह्मीं पाहून नवाबबहादरास आह्मी थैलीपत्र पाठविलें आहे. त्याच थैलींत घालून पाठविलें आहे. बाजूस थैली उसवून पत्र निभावणीचें तुह्मीं चौघांनीं पाहून थैलींत घालून थैली शिवावी. ह्मणजे मोहरही चांगली राहील. तुह्मी पाहाल. पुढें नवाबबहादराकडे रवाना करणें तें तुमचे बोलण्यांत करारांत असेल त्यान्वयें करावें. र॥ छ २५ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.