पो। छ २३ रजब सन लेखांक १६८. १७०२ ज्येष्ठ व. १०.
इहिदे समानीन. श्री. २७ जून १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां।। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मीं ज्येष्ट शुध शष्टीचीं पत्रें राजश्री नाना यांचे नांवें पाठविलीं. त्यावरून सर्व मजकूर समजला. राव सिंदे यांजकडील थैलीपत्र आलें. त्यांत निभावणीचें पत्र नाहीं. ऐसे लिहिलें येतांच विस्मयेंकरून तेच समयीं शुतरस्वार जोडी राव सिंदे यांजकडे पाठवण्यास तयार केली. तों सिंदे यांजकडून छ २५ माहे जमादिलावलचे निभावणीचें पत्र आलें. तें हालीं तुह्माकडे रवाना केलें; पावेल. याउपरी इकडील दिकत तुह्मीं ल्याहावी ऐसी किमपि राहिली नाहीं. नवाबबहादर यांणीं बेंगरुळावर मुकाम न करितां जलद इंग्रजास जाऊन तंबी करावी. तुह्मी कराराप्रमाणें सर्व कामें मिरजकर वगैरे उगवून जलद यावें. इकडील सविस्तर राजश्री नाना यांणीं लिहिलें त्यावरून कळेल. र॥ छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.
राजश्री गणेशपंत स्वामीचे सेवेसीं सां॥ नमस्कार विनंति. आतां इकडील गुंता नाहीं. तुह्मी करारप्रमाणें कामें उगवून सत्वर यावें. हे विनंति.