लेखांक १६२.
१७०२ ज्येष्ठ व॥ १०. श्री. २७ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. मिर रजाअलीखान सरंजामसमेत पिलरीवर गेले. त्यांणीं तमाम इंग्रजाचा तालुका व्यंकटगिरी व कालहास्ती वगैरे ताराज केला. मागाहून नवाबबहादूरही दरकूच चालीले. त्यास, करारप्रमाणें इकडूनही रावरास्ते यांजकडील फौज व मातबर पाठवावा. त्यास, तुह्मी येतेसमयीं नवाबबहादूर यांचे कानावर घालून यावें. ह्मणजे येथून फौजेची रवानगी केली जाईल.
र॥ छ २३ जमादिलाखर हे विनंति.