लेखांक १४५.
१७०२ ज्येष्ठ शु॥ ७. अलीफ. ९ जून १७८०.
बहुत दिवस गुजरले, आंसाहेबांकडून खैरीयतेचें खत येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास, दोस्तीचे अलमांत असें नसावें. हामेश खैरअफीयतचें खत पाठवून दिलशाद करीत जावा, हे लाजम आहे. आमेहेरबाचें जाणें चेनापटणचे जिल्ह्यांत जालें असेल, जालें नसलिया करारबामोजीब जलद जाणें होऊन, इंग्रजास ताण बसवून, सजा अमलांत यावी. गुजराथप्रांतीं करनेल गाडर यासीं व सरकारच्या सरदारांसी लढाई शुरूं आहे. पांच सात लढायांत इंग्रजास नसीहातच जाली. तेव्हां या फौजांपुढें आपला टिकाव होत नाहीं, असें समजोन करनेल गाडर यांणीं सुरतेस माघारा जावयाचा मनसबा करून, नर्मदाकिना-यास आले. पिछावर सरकारच्या फौजा आहेत. कोंकणप्रांतीं ममईकर इंग्रजांनीं हंगामा केला. त्यांचे तंबीचे व कोल्हापूर व कितूरकर वगैरे याणीं सरकारतालुक्यास इजा दिल्ही. त्याचें पारपत्याचे कुल आजीमुलकद्र कृष्णराव नारायण यांस कलमीं केलें. तें जाहीर करतील त्यावरून मुफसल मालुम होईल. तर्फेंन दोस्तीचे यगानगत; तेव्हां सलामसलत पैहाम इतला करीत असावी. सर्व मरातब आसाहेबाचे दिलनिसीन आहेत. ह्मणोन नवाब हैदरअलीखानबहादुर यांस नानांचे नांवें पत्र. र।। छ ५ जमादिलाखर, सु॥ इहिदे समानीन मया व अलफ.