पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४०. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. बेलापुरापुढें कोंकणांत इंग्रज चालून आले. त्यांसीं व सरकारांतून बाजीपंत फौजसह गेले यांसी लढाई जाली. पांच, सा सें होते, पो। तीनसें इंग्रज मारून त्यांच्या पांच तोफा सोडऊन आणिल्या, हा त॥ पेशजीं लिहिलाच आहे. त्या उपरी, बेलापुरास जाऊन बेलापूर घ्यावें, तों साष्टीहून कांहीं जमीयत कल्याणास आलें, हे बातमी कळली. त्याजवरून बाजीपंत फौजसह बेलापुराहून कल्याणास आले. दुसरे दिवसीं मोर्चे देऊन कल्याणास वेढा घातला. पुढें हल्ला करावी, ऐसा सिधांत जाला; तों करनेल गाडर यांजकडून दोन पलटणें सुरतेस आलीं, तेथून तसेंच साष्टीस उतरून जहाजावरून दोन प्रहरीं रात्रीं कल्याणासमीप बाग आहे तेथें येऊन उतरले. रात्रीं कुमक दोन पलटणें आलीं, हें बाजीपंत यांस समजलें नाहीं. यांणीं हल्ल्याचा निश्चय केला होता, त्याप्रों। चार घटका पिछली रात्र आहे तों तयार होऊन हल्ल्यास चालिले. वाटेंत पलटणाची गांठ पडली. तेथें चार घटका लढाई जाली. उपरांत बाजीपंत त्यांस सहा कोसाचा फासला सोडून राहिले. कल्याणांतील इंग्रज व गाडराकडून कुमक दोन पलटणें आली, ते येकत्र जाले. जमाव भारी जाला. तेथून चालून आले. इकडील फौजांनीं तोंड न देतां सरून माघें आले. दुसरे दिवसीं इकडील लोकांनीं एक नाल्याचे ढांसण चांगलें धरून उभे राहिले. इंग्रज नाल्यांत चालून आले. तेथे लढाई फार चांगली जाली. इकडील लोक अरबा पीऊन आंत धसले. हातघाईची लढाई जाली. बेत-हा इंग्रजी लोकांस मार दिल्हा. दोन तीनसें माणूस ठार मारलें. सें दोनसें जखमी जालें. इकडील चाळीस पंनास ठार व जखमी जालें. कांहीं घोडीं पडलीं. आश्रा चांगला होता ह्मणोन फार माणूस इकडील जाया जालें नाहीं. इंग्रजानीं खूब लढाई दिल्ही. गाडराकडून दोन पलटणें आलीं त्यांतील दोघेही सरदार ठार जाले. ममईकर जनरल यांचा जावाई सरदार होता, त्यांचे पोटांत गोळी लागली. फार जेर. वरकड दहा पंधरा मातबर जमातदारच पडले. तेव्हां सरदाराखेरीज त्यांचे लोकांनीं धीर धरवेना. प्रातःकालींच कूच करून माघारे कल्याणास गेले. फौजाही पाठीमाघें गेल्या. कोकणच्या दोन लढाईंत इंग्रज फारच नसीयत पावले. हालीं इकडून राजश्री संक्राजी घोरपडे व भवानी सिवराम यांची रवानगी फौजसह कोंकणांत जाली. बरसातीचे दिवस समीप राहिले. कोकणांत पाऊस लागल्यावर घोड्याचा उपाय नाहीं. महिना पंधरा दिवस पाऊस नाहीं तोंपर्यंत फौजा आहेत; पुढें गाडद पाठवण्याची तर्तूद होत आहे. र॥ छ ४ जमादिलाखर हे विनंति.