पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३९. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सां. नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें. विशेष. राजश्री माहादजी शिंदे यांजकडून नवाबबहादर यांस थैलीपत्र आलें तें पेशजीं रवाना केलें. तें पावल्यानंतर नवाबबहादर यांचें कूच चेनापटणचे सुमारें जालें असेल. कदाचित् नसले जालीया याउपरी त-ही जलदीनें इंग्रजाचे जिल्ह्यांत जाणें होऊन, करारप्रमाणें त्यांस ताण बसवून, तंबी अमलांत यावी. मसलत मोठी. त्यास, किरकोळी दिकती व कल्पनेखालीं दिवस गेले. संपूर्ण आलमांत जालें कीं, श्रीमंत रावपंतप्रधान व नवावबहादुर यांची दोस्ती होऊन टोपीकरास सजा करावी, ऐसा नक्ष्या ठरला. हा लौकीक. त्यांत सरकारच्या सरदारासीं व फौजेसीं लढाई इंग्रजाची शुरूं जाली. नवाबबहादर यांचा सर्व सरंजाम तयार असतां ढील निघण्यास होती, येणेंकडून लौकिकांत नीट दिसत नाहीं. या सर्व गोष्टी नवाबबहादर यांचे ध्यानांत आहेत. तुह्मीही सुचवून, केले मसलतीस सत्वर निघणें होय तें करावें. र॥ छ ४ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.