पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३६. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. गुजराथप्रांतीं सरदारासीं व करनेल गाडर इंग्रज यासीं लढाई शुरूं आहे. पांच चार लढाया जाल्या. त्यांत इंग्रजाची सिकस्तच होत गेली. या फौजापुढें आपला तग निघत नाहीं, ऐसें पुर्तेपणें समजोन माघारें सुरतेस जावें, हा मनसबा गाडर यांणी करून कूच केलें. नर्मदातीरास बावापिराचे घांटी आले. पाठीवर सरकारच्या फौजा आहेतच. नित्य घेराघेरी करितात. नदी उतरतेसमयीं गलबल करून घालवितील या विचारांत गाडर येऊन पैलतीरीं मुकाम करून आहे. नदी उतरण्याचे तजविजीत आहे. छ २१ माहे जमादिलावलपावेतों मुकाम तेथेंच होता. येणेंप्रमाणें बातमी आली. नवाबबहादर यांस सांगावें. र॥ छ ४ जमादिलाखर हे विनंति.