पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १३३. १७०२ वैशाख वद्य ४.
सन इहिदे समानीन श्री. २२ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां।। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून लिहित जावें. विशेष. तुह्मी छ २६ माहे रबिलाखरचें पत्र पाठविलें तें पावून सर्व मजकूर समजला. राजश्री नानांचे पत्रावरून सविस्तर वरचेवर समजतें. नवाबबहादर यांची स्वारीस जाण्याची सर्व तयारी आहे. राजश्री पाटीलबाबा यांचें निभावणीचें पत्र येतांच आमची रवानगी करून नवाबसाहेब योजिले मसलतीस जातात ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, राजश्री पाटीलबावा यांजकडे पत्राविशीं राजश्री नानांनीं फार वेळ लिहिलें. परंतु मार्ग गुजराथचे घांटाचा नीट नाहीं. कासीद जासूद मारले जातात. कांहीं लुटले जातात. पत्रें येत नाहींत. याजकरितां दिवसगत लागली. हालीं राजश्री पाटीलबावा यांचें थैलीपत्र आलें तें पाठविलें आहे. नवाबबहादर यांस देऊन याउपरी चेनापट्टणाकडे जाणें लौकर व्हावें. तुह्मी कार्यभाग उगवून सत्वर यावें. दिवस नाहक गेले. आतां त-ही असें न व्हावें. इकडील सर्व राजश्री नानांचे पत्रावरून कळेल. *र॥ छ १७ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.