पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १३२. १७०२ वैशाख व॥ ४.
सन इहिदे समानीन श्री. २२ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बलाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मी छ २६ माहे रबिलाखरचीं पत्रें पाठविलीं तें पावून वर्तमान कळलें. राव शिंदे यांजकडील निभावणीचें पत्र आल्याखेरीज यांचे निघण्यास गुंता ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, सरकारची व नवाबबहादूर यांची दोस्ती होऊन इंग्रजाचें परिपत्य करावें हे गोष्ट लहान नाहीं. सलाहमसलत तरफैनची एक. असा स्नेह व दोस्ती माघें कैलासवासी यांचे कारकीर्दीस जाली नाहीं. तो योग हालीं घडला. असें असतां पत्रासाठींच मसलत तटून रहाणें हें काय ? व बाजारू खबरा ऐकून कसें होतें याची प्रतीक्ष्या पहाणें, हें असें दोस्तीस लाजम नाहीं. लौकिकांस दिसतें कीं, कसें होतें हें पाहून मग करणें तें करावें. यास्तव ही गोष्ट नसावी. इकडून शिंदे यांस पत्राविशीं फार वेळ लिहिलें. परंतु, वाटेच्या नादुरुस्तीमुळें दिवसगत लागले. हालीं शिंदे यांजकडून पत्र आलें तें थैली पाठविलें आहे. नवाबबहादर यांस देऊन याउपरी नेमले मसलतीवर अतित्वरेनें होय ते गोष्ट घडावी. तुह्मीं मिरजकर वगैरे कामें करून यावें. कितेक इकडील श्रीमंत राजश्री नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल. रवाना छ १७ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
राजश्री गणेशपंत स्वामी सां।। नमस्कार विनंति उपरी लिहिलें परिसिजे, लोभ कीजे हे विनंति.