पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १३१. १७०२ वैशाख वद्य ४.
सन इहिदे समानीन श्री. २२ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:--
पोष्य आनंदराव नरसिंव्ह कृतानेक सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल वैशाख वदि ४ पावेतों यथास्थित जाणून स्वकुशललेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. आपण कृपा करून पत्रें पाठविलीं तीं पावून सविस्तर अर्थ कळूं आले. राजश्री महादजी शिंदे यांजकडील निभावणीचे पत्राविसी श्रीमंत राजश्री नाना यांस सांगून सांडणी स्वार व जासूद वे अजूरदार वरचेवर रवाना करविले. मार्गाच्या आनसंकटांमुळें उपाय चालेना. परवां आपणांकडून सांडणीस्वार पत्रें घेऊन आले ते समयीं दरबारांत आह्मी होतों. पत्रें पावून सिंदे यांजकडील पत्र अद्यापि आलें नाहीं याजमुळें मसलत तटली आहे ह्मणून, येविसींचें बोलणें परस्परें होत असतां शिंदे यांजकडून निभावणीचें पत्र थैलीसुद्धां व राजश्री त्रिंबकराव व तीर्थरूप नरसिंगरावदादा यांस पत्रें आलीं. त्यावरून बहुत संतोष जाहला. त्यावर श्रीमंत राजश्री नाना यांचें व आमचें बोलणें होऊन, हजरत नवाब साहेब यांस व आपणांस हें वर्तमान कळावें ह्मणोन हजुरास अर्जी व तीर्थरूप वडिलांस पत्र व राजश्री गणपतरावदादा यांस, श्रीमंत राजश्री आण्णा सो। रास्ते यांचें पत्र, येणेंप्रमाणें पत्रें वद्य प्रतिपदेस येथून आंचीवरून रवाना केलीं आहेत. पावून वर्तमान कळेल. आपलीं पत्रें परवां आलीं, त्याची उत्तरें श्रीमंत राजश्री नानांनीं लेहून शिंदे यांजकडील निभवणीचें पत्र वगैरे हालीं सांडणीस्वारांबरोबर रवाना केलीं आहेत. पोंहचून सर्व अर्थ ध्यानांत येतील. राजश्री गणपतरावदादा बहुत लायक ह्मणोन यांच्या सुस्वभावाचा विस्तार आपण लिहिला. अशास, श्रीमंत राजश्री रास्ते यांचे संग्रहीं गृहस्थ उत्तमच आहेत. यांत गणपतरावदादा यांचे ठाईं योग्यता विशेष, हें जाणूनच प्रस्तुतही आपणासमागमें श्रीमंतांनीं रवाना केलें. मुख्य गोष्टी आपण थोर, आपल्या थोरवी प्रों। सर्वांचा सांभाळ करणार. वे॥ राजश्री गोविंदभटजी तात्या यांनीं आपल्या पत्राचें उत्तर दिल्हें तें पाठविलें आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.