पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १२९. १७०२ वैशाख व॥ ३.
सन इहिदे समानीन श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाबबहादर यांची सर्व तयारी जाली आहे. एक रावसिंदे यांचें निभावणीचें पत्र येण्याचा गुंता, सुतरस्वार व जासुदजोडी एक वरचेवर गुजराथप्रांतीं पाठवून पत्र सत्वर ये, तो प्रकार करावा. विनापत्र आल्यासिवाय नवाबबहादर यांचे निघण्याचा योग होत नाहीं. पत्र येतांच आपण स्वार होऊन आमची रवानगी ते समयीं करणार ह्मणोन दर पत्रीं लिहिलें. ऐसीयास, इतके दिवस पत्राविशीं राव सिंदे यांस फार वेळ लिहिण्यांत आलें. परंतु वाटेच्या खलेलामुळें पत्रें येऊं न पावलीं; यांस उपाय नाहीं. नवाबबहादर यांची नजर मसलतीवर असोन त्याणीं कूच करून जावयाचें होतें. पत्र येताच रवाना करून देतों तें न जालें. मसलतीस फार लांबण पडली. हालीं राव सिंदे यांचें पत्र आलें ते थैलीच पाठविली आहे. नवाबबहादर यांस प्रविष्ट करावी. याउपरी नवाबबहादर याणीं इंग्रजांवर लौकर जावें. तुह्मी करारप्रमाणें कार्यभाग उरकोन सत्वर यावें, मिरजकर मंडळीस बराबर घेऊन यावें.
र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.