पो। छ २ जमादिलाखर लेखांक १२८. १७०२ वैशाख वद्य ३.
सन इहिदे समानीन श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाब निजामअलीखानबहादर यांजपासीं चेनापट्टणकर कुमशेलवाले आहेत त्यांणीं नवाबबहादर यांस पत्र लिहिलें होतें. त्याचा जाब नवाबबहादर यांणीं साफ दिल्हा आणि आह्मांस सांगितलें कीं, निजामअली यांस मदारुलमाहाम यांणीं लेहून त्यास निरोप देत ऐसें करवावें, ह्मणोन लिहिलें. त्यास, इंग्रज मकरी, चहूंकडून राजकारणें लावावयास चुकणार नाहींत. नवाबबहादर यांणीं साफ उत्तर दिल्हें, ठीक केलें. इकडून नवाब निजामअलीखां यांसही कुमशेलवाले यांस रुकसत करणें, ऐसें लिहिण्यांत येईल. र॥ छ।। १६ जमादिलावल हे विनंति.