पो। छ २ जमादिलाखर लेखांक १२७. १७०२ वैशाख व॥ ३.
सन इहिदे समानीन श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. श्रीमंत रावपंतप्रधान यांची दौलत मोठी, सिपाई लोकांची विलायेत, येणेंकडून मजबूत. दुसरें, नवाबबहादूर यांची दौलत भारी, सरंजाम पोख्त, तर्तूद चांगली, आणि तरफैन दोस्ती जाली. तेव्हां वरकडाचीं स्वरूपें व तेज रहाणार नाहीं. उभयतां एक असतां इंग्रजास मोजितात ऐसें नाहीं. हें जाणून कितेक नाना प्रकारें खरें खोटें भासवून लटक्या कल्पना मनांत घालून दोदिल करावे, ऐसें करणार करितात. आणि पुढेंही यापरीस अधिकोत्तर उदेग करतील. येविशीं इकडील खंबीर पक्का आहे. नवाबबहादूर यांचीही कायेमी याचप्रमाणें असावी. कोणीही वेडें वांकडें समजाविलें तें न ऐकतां जें चित्तांत येईल तें इकडें लिहीत जावें. इकडून लिहिण्यांत येत जाईल. लटके संशय घालणार फार आहेत. त्यावर मदार ठेऊं नये. र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.