लेखांक १२५.
१७०२ वैशाख वद्य ३. श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरीः. परभारें इकडे मनस्वी बाधावाई खबरी आल्या कीं, सिंदे, होळकर यांणी श्रीमंताचें लक्ष सोडून तिकडे मिळाले. दुसरी खबर सिंदे यांस दगा जाला, ऐशा येतात; ह्मणोन लिहिलें. ऐसीयास बाजारू गप्पा मनस्वी. त्यास कोठें धरावयास जागा नाहीं. दौलतीचीं कामें कोठें बाजारू आवयांवर चालतात कीं काय ? याजवर जाऊं नये; आणि अशा गोष्टी ऐकाव्या तरी कशा बरें ? अशा खोट्या गोष्टी कोण्ही लिहिणार लिहित असेल, त्यास एकदोन खबरी लटक्या पडल्यावर त्याचें पारपत्य असावें कीं नाहीं ? उगेच मर्जी बेहरम करून लिहिण्यांत मसलतींत दोष किती पडतात, याचा विचार नवाबबहादर यांचे ध्यानांत असेलच. तुह्मींही समजोन सांगावें. नवाबबहादर यांची दोस्ती जाली. मसलत एक, तेव्हां होईल वर्तमान इकडून लिहिण्यांत येईल कीं नाहीं ? दादासाहेबांकडील मंडळी चिंतो विठ्ठल, सदाशिव रामचंद्र, सिंदे याजपासीं होते. त्यांचें राजकारण फितूर अढळतांच कैद करून किल्लोकिल्ल्यास पाठविलें; याजवरून कसें आहे हें समजावें. तिकडे मिळाले मग यास कां कैद दगा ह्मणावा, तरी इंग्रज हाटऊन तंग करून बडोद्यास घालविले. आह्मांसी नीट सिंदे नाहींत, याची परिक्षा त्यांचें पत्र नबाबबहादरास आहे, त्यावरून ध्यानांत येईल. सरकारचे आज्ञेखेरीज सिंदे आहेत कीं आज्ञेंत, याची परिक्षा पत्रांत असेल. सारांष, बाजारू गपा ऐकूं नयेत. कारण, इतका तपसील पारहेरा ल्याहावा लागतो. याउपरी तरी लबाड लिहिणार त्यास इतक्यावर कायेल करून,नवाबबहादर यांणीं फजित करावें. कांहीं तरी प्रमाण असावें. याचा बंदोबस्त व्हावा. होतें तें वर्तमान इकडून आनंदराव यांस सांगण्यांत येतें. मग ते काय लिहितात न कळे ? रा॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.
पो। छ २ जमादिलाखर, सन इहिदे समानीन.