पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२४. १७०२ वैशाख व।। ३.
सन इहिदे समानीन. श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. गुजराथचें वर्तमान तपसीलें पेशजीं नवाबबहादर यांचे आंचीवर लिहिलें त्यावरून कळलें असेल. अलीकडील मजकूर तरी, इंग्रजांचे लोकांस सरकारफौजापुढें दम निघेना. उंटे, बैल लुटले गेले. सबब हाटून बडोद्यास गेले. फौजाही पाठीवर आहेत. त्याउपरी कांहीं पलटणेंसहीत इंग्रज कही भरावयास आले. तेथें सरकार फौजेनें गांठ घातली. तेथें लढाई जाली. पलटणें हाटऊन कही लुटली. कांहीं छकडेही आणले. बडोद्यास दाणा चारा मिळत नाहीं. सबब तेथून कूच करून भडोचास जाणार; तेथून सुरतेच्या आस-यास जावें ऐसें आहे. गाडर याणीं भडोचकरास रसद पाठवून देण्याविसीं लिहिलें. त्याचें उत्तर भडोचकरांनीं लिहिलें कीं, रसद तुह्मांस पोंहचणार नाहीं, तुह्मींच निघोन येणें. त्यावरून गाडर जाणार. फौजाही लागून आहेतच. होईल तें मागाहून लिहिण्यांत येईल. र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.