पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२२. १७०२ वैशाख व।। ३.
सन इहिदे समानीन. श्री. २१ मे १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. सरकारची व नवाबबहादर यांची दोस्ती जाली. इंग्रजांचें पारपत्य करावें ऐसें ठरलें. तरफैन सलाहखेरीज सलूख सहसा न करावा ऐसें जालें. त्याप्रमाणें सरकारच्या फौजा व सरदार जाऊन आज तीन महिने लढाई बेजरब शुरू आहे. बहादराचें निघणें होत नाहीं. मसलत मोठी असें असतां लिहिण्याखालीं दिवस गेले. राव सिंदे यांचें पत्र इतके दिवस वाटेच्या खलशामुळें न आलें. ह्मणोन मसलतीस दिवस घालवावे हें काय ? पत्र आघेंमाघें येतेंच आहे. याप्रमाणें घडत नाहीं. जाण्यास दिवसगत लागली याजमुळें लोक तर्क करतात कीं, नवाबबहादर निघत नाहींत, गुजराथेंत फौजा गेल्या यांचें कसें होतें आहे हें पहातात. ऐसियास, स्नेह दोस्ती जाली तेथें हें नसावें. सरकारच्या फौजांनीं इंग्रज तंग केले आहेत, नीटच आहे. अगर काय? इकडे अथवा नवाबबहादराकडे लढाई आहे त्यांत कमपेश जालें तरी त्याजवर नजर असावी कीं काय ? जे मसलत केली ते केली. त्यांचें कसें होतें या पाहण्यानें लोकांस तमाषविनी दिसते. मसलत एक, तेव्हां सर्वांनीं त्यास झोंबून ज्याबज्या ताण द्यावे हीच चाल असावी. पहावें तसें करावें हें कायमीस नसावें. सर्व परजे नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहेत. ल्याहावें ऐसें नाहीं. तुह्मींही बोलावें. रा।। छ १६ जमादिलावल हे विनंति.