पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२१. १७०२ वैशाख व।। ३.
सन इहिदे समानीन. श्री. २१ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. शिंदे यांजकडील निभावणीचें पत्र आल्याचें वर्तमान नवाबबहादर यांस व आपणांस कळलें, याजकरितां छ १४ रोजीं राजश्री गणपतराव केशव यांचे नांवें पत्र व नवाबबहादर यांसीं अर्जी आनंदराव यांची आंचींवरून रवाना केलीं, ती पावून समाचार कळेल. हालीं शिंदे यांजकडील निभावणीचें पत्र व आपल्याकडून पत्र आल्याचीं उत्तरें सरकारचे सांडणीस्वाराबराबर रवाना करविलीं आहेत, पोंहचतील. त्याअन्वयें नवाबबहादर यांस सांगून सर्व कामेंकाजें उरकून सत्वर यावें. निरंतर पत्रीं सानंदवीत जावें. रवाना छ १६ जमादिलावल बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा हे विनंति.