पो। छ २ जमादिलाखर, लेखांक १२०. १७०२ वैशाख व।। १.
सन इहिदे समानीन. श्री. १९ मे १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णरावजी तात्या यांसीं:-
प्रती गोविंदभट निदसुरे. आशीर्वाद विनंतिः- येथील कुशल तागाईत छ १४ जमादिलावलपावेतों वर्तमान यथास्थित जाणून स्वकीये कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आपणांकडून पत्रें येऊन बहुत दिवस वर्तमान कळत नव्हतें. त्यास, हालीं सांडणीस्वार जोडीसमागमें छ १३ माहे मजकुरीं पत्र आलें. तेणेंकरून बहुत संतोष जाहला. असेंच सदैव पत्र पाठवून कुशलार्थ वरचेवर लिहीत असावें, तेणेंकरून समाधान होत जाईल. यानंतर इकडील सविस्तर वृत्त श्रीमंतांचे पत्रीं लिहिलें आहे, त्याजवरून सर्व कळों येईल. आपले घरचे पत्रें होतीं तीं सातारियास पाठविलीं आहेत. सरकारकार्य करून लवकर यावें. भेट होईल तो सुदीन. बहुत काय लिहिणें? लोभ करावा हे आशिर्वाद.