लेखांक ११९.
१७०२ वैशाख शु॥ १२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. सरकारच्या फौजा सरदार व इंग्रज यांची लढाई गुजराथप्रांतीं शुरू जाली त्याचा ता। पेशजीं लिहिला आहे. त्याउपरी अलीकडील मजकूर तरीः- सरकारच्या फौजावर शबखून घालावा हा इरादा इंग्रजांनीं करून, रात्रौ पोख्त सरंजामानसीं चालून आले. हे बातमी अगाव थोडीसी राजश्री रावसिंदे यांस समजली होती. हेही तयार होऊन, गोटा बाहेर येऊन, मोकाबिल्यास उभे राहिले. तरफेन तोफांची मारगिरी जाली. शेवटीं इकडील लोकांनीं आगळीक करून आंत धसले. हत्यार चालिलें. दोहींकडील सें दिडसें लोक जखमी व ठार जाले. इंग्रजांकडील सरदार करनेल गाडर यांचा भाचा व तोफखान्याचा दारोगा व एक कोशलदार ऐसे तिघे ठार जाले. लढाई मोठी जाली. सेवटीं इंग्रजांनीं सांभाळोन निघोन आपले गोटांत गेले. फौजा पाठीवर होत्याच. त्यानंतर दुसरे दिवशीं सरदारांनीं उजनीकडून पेंढारी आणविले होते ते, बारा पंधरा हजारानसी येऊन दाखल जाले. त्यांस पोशाग वगैरे बहुमान करून इंग्रजाभोंवतें नेहमीं घेराघेरी करावयाचें काम सांगितलें. त्याप्रो। पेंढारी यांणीं नित्य तलावा करून, कहींचे बैल व उंटे, घोडीं, दोनचार वेळ वळून आणिलीं. बडोद्याहून रसद येत होती ते दरोबस्त लुटली. पुढें पकी बंदी केली. माणूस जाउं येउं न पावे, ऐसें जालें. तेणेंकरून इंग्रज तंग जाले. उपाये नाहीं. गिराणी बहुत जाली. तेव्हां, मनसब्यांत आले. कही बंद झाली जाणोन, कहीचा बंदोबस्त करून, दोन तीन पलटणें बराबर देऊन, कही पाठविली. त्यास पेंढारी बराबर जमोन समय पाहोन होतेच, त्यांणीं पाटिलबावा यांस इशारा केला कीं, आज कही पलटणासुद्धां भरावयास आले. यास्तव, अशांत कांहीं फौज यावी. त्यावरून, पाटिलबावा यांणी पांच चार हजार फौज व धारराव सिंदे पाठविले. यांणीं पलटणासी गांठ घातली. इकडे लढाई शुरू जाली. तिकडे पेंढारी यांणीं कही लुटली. लढाईही मातबर जाली. धारराव सिंदे यांचा बसता घोडा पडला. लोकही कांहीं ठार जखमी जाले. पलटणांतील इंग्रजी लोकही फार मारले गेले, इंग्रज खटे होऊन कही गमाऊन माघारे गेले. त्यानंतर दातकसाळीस येऊन दुसरे दिवशीं इंग्रज तीन कोस चालून आले. सरदारांनीं आपली जागा सोडून कोसपावेतों अंगांवर घेतलें. तेथून फौजा उलटून माघें इंग्रजांचा तळ व बुणगें होतें तेथें गलबल केली. इंग्रज सडे राहिले. निभाव होईना ऐसें जाणून, माघारे हाटून बडोद्याचे आस-यास गेले. फौजाही सभोंवत्या लागून गेल्या. नित्य घेराघेरी करितच आहेत. कही बाहेर निघों देत नाहींत; बंदी केली आहे. बडोद्यांतही पाणी, गल्ला, व चारा कमीच आहे. थोडेच दिवसांत आयास येतील. बडोदें जवळ होते ह्मणोन गेले. नाहीं तरी तळेगांवचीच गत होण्याची संधी होती. बरें! ईश्वरइच्छेनें घडेल तें दृष्टीस पडेल. अशांत नवाबबहादुर यांजकडून चेनापट्टणाकडे ताण बसता, ह्मणजे मोठी निकड इंग्रजास बसती. याउपरी तरी त्वरा व्हावी. दोन तीन वेळां लढाईंत मिळून हजार उंट व हजार घोडे पाडाव आणिले. सात आठशें माणूस इंग्रजांचें ठार मारिलें, इंग्रजांवर जरब बसवून उभयतां सरदारांनीं त्यांस पेंचांत आणिलें आहे. सुरतेकडे गणेशपंत बेहेरे फौजसुद्धां आहेत, त्यांणीं वरकड ठाणीं तो सरकारचीं बसविलींच होतीं. उरपाडचें राहिलें होतें तें हल्ला करून घेऊन, तीनसें माणूस इंग्रजाचें ठार मारिलें.
र॥ छ १० जमादिलावल हे विनंति.
पो। छ २६ जमादिलावल, सन समानीन.