लेखांक ११८.
१७०२ वैशाख शु॥ १२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरीः- राजश्री परशरामभाऊ फौजेसह करवीरचे मोहिमे आहेत. राजश्री येसाजी सिंदे यांजकडील गुमटास मोर्चे लाविले होते. तें ठाणें हल्ला करून घेतलें. आंतील कांहीं लोक मारले गेले, कांहीं पळोन गेले. तेथें ठाणें काईम करून, सिरवळास मोर्चे दिल्हे. दों ती दिवसांत सिरवळ घेतलें. एसाजी सिंदे करविरांतच आहे. याप्रमाणें वर्तमान आहे. तुह्मीं नवाबबहादर यांस सांगावें. कित्तुरकरांनीं सरकारांतील तालुक्यांत उपद्रव मनस्वी केले, याकरितां त्यांचे पारपत्यासही भाऊ जातील. रा॥छ १० जमादिलावल हे विनंति. पो। छ २६ जमा॥वल, सन समानीन.