लेखांक ११६.
१७०२ वैशाख शुद्ध १२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरीः- राजश्री सदाशिव रामचंद्र वगैरे शागीर्द मंडळी दादासाहेबांकडील, पाटीलबावा यांजपासीं होते, त्यांणीं कांहीं फितूर केला, ते कागदपत्र पाटीलबावा यांस सांपडले, त्यावरून सर्वांस कैद करून, बेड्या घालून पायागडास रवाना केले. सदाशिव रामचंद्र यांस कैद करून उजनीस पाठविलें. यांत राजश्री चिंतो विठ्ठल नव्हते. ह्मणोन राहिले. दो चों रोजांनीं चिंतोपंत तयार होऊन इंग्रजाकडे जावें या मनसब्यानें निघोन गेले. ते वाटेंत तकव्याचे राऊतास सांपडले त्यांणीं धरून आणलें. तेव्हां त्यांसही कैद करून उजनीस रवाना केले. याप्रमाणें तिकडील ग्रंथ जाला. लबाड, क्रियानष्ट, यांचा कोठें परिणाम लागतो? शेवटीं होण्याचें तें जालें. फजीत पडले. तसेंच पुण्यांतील फितुरी झाडून धरून कांहीं किल्ल्यावर घातले. कांहीं द्रव्यहारण करून आपापले घरीं पुणियांतच चौकींत ठेविले. ऐकूण पका बंदोबस्त केला. हें सर्व वर्तमान तुह्मीं नवाबबहादर यांस सांगावें. पकी दोस्ती जाली तेव्हां तर्फेंन वर्तमान कळत असावें. सबब लिहिलें असे. रा।। छ १० जमादिलावल हे विनंति.