पै॥ छ ५ जमादिलावल, लेखांक १०४. १७०२ चैत्र व॥७
सन समानीन श्री. २५ एप्रिल १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणूल स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं पत्रें पाठविलीं तें पावलीं. श्रीमंतांचे पत्रावरून सर्व अर्थ ध्यानांत आले. नवाबबहादूर यांणीं चेनापट्टणकर कुमसेलवाले यांस निरोप दिल्हा. खेमे बाहेर जाले. आमचे रवानगीची तर्तूद जाली. राजश्री पाटीलबावा यांजकडील निभावणीचे पत्राचा मात्र गुंता. तें सत्वर पाठवावें. ह्मणजे, आह्मांस रुकसत देऊन आपण चेनापट्टणाकडे जातील, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, पाटीलबावांकडे पत्राविसीं सांडणीस्वार व जासूद जोड्या फार रवाना केल्या. मार्ग नीट नाहीं, ह्मणोन कांहीं मारले गेले. कांहीं पोहचले न पोहचले, याचा संशय. सबब, तुमचीं पत्रें येतांच आणखी जोड्या रवाना केल्या. तों कालच पत्रें आलीं कीं, मसविदा पावला. इदईक मसविद्याप्रमाणें पत्र सत्वरच येईल. केवळ या पत्राकरितां तटून राहणें ठीक नाहीं. नवाबांनीं मसलतीवर जावें. पत्र येतांच पोहचाऊन देत असों. आलें ऐसें जाणून दरकुच जावें. एविशीं तुह्मीं व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबबहादर यांची खातरजमा करावी. सविस्तर श्रीमंत नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल. *र॥ छ १९, रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री गणेशपंत स्वामीस सं॥ नमस्कार. लोभ कीजे हे विनंति.