लेखांक १०१.
१७०२ चैत्र व. ७ श्री. २५ एप्रिल १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. राजश्री माहादजीराव सिंदे यांस अशेरीचा किल्ला सरकारांतून दिल्हा असतां त्यांस प्राप्त होत नाहीं. सरदार मातबर ! किल्ल्याचा मजकूर काय ? किल्ला त्यांस देऊन त्यांचा संतोष राखावा, ऐसें नवाबबहादूर बोलून ल्याहावयास सांगितलें, ह्मणोन लिहिलें. ऐशियास, शिंदे उमदे सरदार, बाजूचे एकनिष्ट. त्यांत अकृत्रिम आमचा भाऊपणा! शेकडों किल्ले त्यांणीं सरकारांत मिळऊन दिल्हे, आणि पुढेंही उमेद तसीच; ऐसें समजोन, अशेर त्यांजकडे करार करून सनदा दिल्ह्या. त्यांत गुंता नाहीं. दरमियान किल्लेकरी लबाड्या करितो, त्याचीही तजवीज होत आहे. लौकरच किल्लेदाराचें पारपत्य होईल. दुसरा अर्थ किमपि नाहीं. याप्रमाणें वास्तविक आहे. तुह्मीं नवाबबहादूर यांसीं बोलावें. *रा।. छ १९ रबिलाखर. हे विनंति.