पै।। छ २९ रबिलावल, सन लेखांक १००. १७०२ चैत्र व।। ५
समानीन. मया व अलफ. श्री. १४ एप्रिल १७८०.
श्रीमंत राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णरावतात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- तुह्मीं दोन तीन पत्रें पाठविलीं, तें पावलीं. सर्व मजकूर समजला. मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें सत्वर यावीं. नवाबबहादूर यांजकडील सरंजामी सर्व जाली, पत्रें येण्याचा मात्र गुंता, ह्मणोन लिहिलें. त्यास, नवाबबहादूर यांचे दोस्तीवर नजर देऊन, व इंग्रजाची मोहीम त्यांस तंबी करावी व त्यांत नफे ही फार, ऐसें जाणून, छ २१ माहे सफरीं मसविद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें शुतरस्वाराबराबर रवाना केलीं, तें पोहचलीं असतील. इकडील गुंता राहिला नाहीं. याउपरीं सत्वर नवाबबहादूर यांणीं चेनापट्टण जिल्ह्यांत जाऊन इंग्रजास बतंग करावें. कुमशेलवाले यांस साफ बोलून निरोप द्यावा.•••••••••••••••जात ठेवूं नये. तुह्मीं करारप्रमाणे कामें सर्व उगऊन मिरजकरसहित लौकर यावें. इकडील सविस्तर श्रीमंत राजश्री नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल. *र॥ छ १७ रबिलावल बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री गोविंदराव व गणेशपंत स्वामींस सां। नमस्कार विनंति उपरी. तुमचे लिहिल्याप्रमाणें सरकारचे कागदपत्र सर्व रवाना केले आहेत. पावले असतील. सर्व कामें उरकोन नवाबबहादरांचें जाणें चिनापट्टणाकडे होऊन इंग्रजास तंबी होय, ती गोष्ट करावी. लोभ कीजे. हे विनंति.