पो। छ २२ रबिलाखर, लेखांक ९८. १७०२ चैत्र शु॥९.
सन समानीन. श्री. १३ एप्रिल १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. अलिकडे तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं हें काय ? ऐसें नसावें. राजश्री नाना यांस हालीं पत्र आलें, त्यावरून सर्व भाव समजले. नवाबबहादूर यांणीं, चेनापटणकर कुमसेलवाले आले होते, त्यांसी साफ उत्तर देऊन निरोप दिल्हा. आपण डेरे बाहेर दिल्हे. सत्वरच डेरेदाखल होऊन जाणार. आह्मांस निरोप देण्याची तजवीज केली आहे. दो चौ रोजीं निरोप देणार, ह्मणोन मजकूर होता. ऐसीयास, मसलतीचा ठराव व सरकारांसीं व नवाबबहादर यांसीं दोस्ती आस्विन मासीं जाली. त्यास साहा महिने जाले. अदियाप लिहिण्याखालींच दिवस आहेत. सरकारच्या फौजा जाऊन लढाई दररोज होत आहे. अशांत नवाबबहादर यांचें जाणें सत्वर व्हावें. कुमसेलवाले यांस रुसकत दिल्ही, उत्तम. नवाबबहादर यांची सरंजामी सर्व तयार आहे. जलद त्यांचे तालुकीयांत नमूद होऊन, चैत्र अखेर पावतों लढाई जाल्याचें वर्तमान यावें. तरीच केलें कर्माचें सार्थक. जाण्याची जलदी व्हावी. तुह्मीं सर्व कार्य उगऊन लौकर यावें. सविस्तर राजश्री नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल. गोविंदराव नारायण यांचा काळ जाला; फार वाईट जालें. मनुष्य चांगला होता. उपाय नाहीं ! र॥ छ ७ माहे रबिलाखर. *बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.