पै॥ छ २२, लेखांक ९७. १७०२ चैत्र शु॥९.
रबिलाखर. श्री. १३ एप्रिल १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री गणपतराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- तुम्हीं पत्रें राजश्री नाना व राजश्री लक्ष्मणराव अण्णा यांस पाठविलीं, त्यांवरून सविस्तर मजकूर समजला. गोविंदराव व नारायण यांस देवआज्ञा जाली. मोठें वाईट जालें. आयुष्यमर्यादेस यत्न नाहींच नाहीं. नवाबबहादर यांणीं कुमसेलवाले यांस रुकसत दिल्ही. डेरे बाहेर दिल्हे, आमची रवानगी कर्ण्याचा उद्योग होत लौकरच रुकसत देतील ह्मणोन लिहिलें. ऐसियास दिवस कांहीं बाकी राहिले नाहींत. याउपरी नवाबबहादर यांचें जाणें चेनापटण प्रांतीं होऊन, इंग्रजासीं लढाई जाली हीं वर्तमानें चैत्र अखेर कळावीं. तरी केली मसलत चांगली. सर्व दरजे समजोन त्वरा घडावी. तुम्हीं आपलीं कामें सर्व उगऊन लौकर यावें. र॥ छ ७ माहे रबिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.