लेखांक ८४.
१७०१ फाल्गुन शु. ८ श्री. १४ मार्च १७८०.
राजश्री कृष्णराव व गोविंदराव गणेशपंत स्वामींसः-
विनंति उपरी. तुह्मीं दोन चिट्या पाठविल्या, त्या पावोन लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. करार करून घेऊन आलों. एक येथें जाला. एक तोडून सांगावें तर शब्द ठेवाल. याजकरितां दम धरून, पत्र सांगितलेप्रमाणें लिहिलें आहे. तिकडील वर्तमान कसें काय कळत नाहीं. कालदेश पाहून आज्ञा करावी. मिरजकरांविशीं रजबदल केली. उत्तर स्पष्ट जालें कीं, त्यांचा दारमदार होऊन चार महिने जाले. वरकड तेथील रीत-भाषण-कर्तुत्व याचे प्रकार लिहिले तें सर्व कळलें. त्यास, तेथून याद आली त्याप्रमाणें तहनामा पाठविला असतां, सरकारनुकसानीचा मसुदा करून पाठविला, तोच मान्य करणें प्राप्त. कारण, मसलत आरंभिली आणि आतां नाहीं ह्मणणें ठीक नाहीं. येविसीं अलाहिदा लिहिलें आहे. त्याप्रमाणें बोलोन सरकारचे तहनाम्याप्रमाणें त्यांचे कागदपत्र उगऊन घेणें. पुढील सालचे ऐवजाची रजबदल करणें जाल्यास उत्तम. न जाल्यास पंधराचा निकाल करून पक्का घेणें. मिरजकरांविशीं तर सख्त रजबदल करावी. तहनामा करार जालेला फिरऊन मर्जीप्रमाणें दुसरा करून पा।, त्यापेक्षां मिरजकर वगैरे यांची गोष्ट अधिक नाहीं. त्यांणीं ऐकावी. नरसिंगराव व तुह्मीं मिळोन, हें काम जरूर जरूर करणें. शेवटपर्यंत वोढिलें तर तहनाम्याप्रमाणें निकाल करून येणें. पाडाव ठेविले असतां कांहीं प्राप्त व्हावयाचें नाहीं. जीव घेतील तर घेऊत. परंतु एवढी तहाची गोष्ट जाली असतां त्यांणीं वोढूं नये. आमचे मर्जीचें काम आहे. खामखा करावें. नाहीं तर लिहिल्याप्रमाणें निकाल पाडून यावें. खंडणीचे निरखाची याद पाठविली. त्यास, सर्व प्रकारें वयात जाली असतां नाणें शिरस्तेप्रमाणें घ्यावें, ठीक नाहीं. नख्तच रुपये द्यावे असें बोलावें. देतील. वोढूंच लागले तर निरखाप्रमाणें कबूल करावें. दोन खुलासे लिहिले आहेत. हे आमचे मतें करून घ्यावेंच घ्यावें. नच होय तर तहनामा पाठविल आहे. याप्रमाणें निकाल पक्का करून घेऊन येणें. *सारांश, मिरजकर वगैरे मंडळी एक साल सोडले, त्याचे मसुद्याप्रमाणें करारनामा पत्रें पाठविलीं, त्यापक्षीं हें बोलून त्यांची चिठ्ठी माघारी देऊन सोडवावें. नच सोडतील तर जीव त्यांचे तेथें राहतील. त्यांत फायदाही नाहीं. आणि ऐकिलें तर आमची गोष्ट बहादरानें ऐकिली असें होईल. तोडावयाचें याच कामाकरतां नाहीं. कराराप्रमाणें लौकर करून यावें. हे विनंति.
पै।। छ ७ रबिलावल सन समानीन फा॥ मास.