लेखांक ८०.
१७०१ माघ वद्य ॥ ३० श्री. ६ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: -
विनंति उपरी. येथें कलकत्त्याहून बातमी आली की, तेथून दाहा पलटणें रवाना जालीं. पैकीं सहा श्रीकासीस आलीं. मागाहून च्यार येत आहेत. तीं आलियानंतर खुसकीचे मार्गें सुरतेस जाणार. याप्रमाणें नवाबसाहेब यांणीं सांगितलें. तिकडे ही बातमी आलीच असेल, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, ही बातमी दोन महिने सरकारांत आली. परंतु पलटणें येण्याची उमेद दिसत नाहीं. तथापि त्या रुखावर हिंदुस्थानांत सरदार व फौजा नेहमीं ठेविल्या आहेत. राजश्री शिवाजी विठ्ठल व खंडेराव त्रिंबक पोंवार, बळवंतराव धोंडदेव व बाळाजी गोविंद बुंदेले, शिवाय सिंदे, होळकर यांचे एक एक सरदार, ऐसी कुलजमीयेत पंचवीस हजार नेहमीं ठेविली आहे. त्याची चिंता नाहीं. दुसरें, भोंसले फौजसह बंगाल्यांत येतात, हें ही वर्तमान त्यांस गेलें. त्यावरून पलटणें तमाम माहालचीं घाबरेपणें जमा करावयास लागले. तेव्हां हीं फलटणें हिंदुस्थानांतून येतात ऐसें नाहीं. आल्यास त्यांचे तंबीपुर्ती फौजही आहे. सर्व वर्तमान, नवाबांस इकडील फौज त्या तोंडावर किती आहे हें परस्परें कळतच असेल. तुह्मींही सांगावें. *र॥ छ २९, सफर. हे विनंति. चौहूंकडून इंग्रजास ताण बसला ह्मणजे आपलेंच संभाळावयास लागतील. हे विनंति.
पो। छ १९, रबिलावल, समानीन.