लेखांक ७७.
१७०१ माघ वद्य ३० श्री. ६ मार्च १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी- नवाबबहादर यांची परवानगी घेऊन श्रीरंगस्वामीचे दर्शनास गेलों. नवाबाकडील मातबर बराबर होते. सर्व देवांचीं दर्शनें करविलीं. गोपुरें व देवालयांतील रचना, त्रिकाल पूजा व ब्राह्मणांची मर्यादा पाहिल्यावर, याप्रा। दुसरें स्थल नसेलसें वाटलें. दर्शनें करून, उपरांतिक तमाम कारखाने पाहिले, त्याचा तपसील फार विस्तारें लिहिला, तो सर्व समजला. ऐसीयास, देवब्राह्मणांची मर्यादा मोठी, हें उगेंच ऐकत होतों. हालीं सर्व तुह्मीं लिहिल्यावरून परम संतोष जाला. देवाब्राह्मणांची मर्यादा नवाबबहादर फार करितात, ह्मणोनच दिवसेंदिवस दौलतीस जिल्हे व रवनक आहे. याच योगेंकडून इंग्रज सिकस्त करून नवाबास यश येतें, यांत गुंता नाहीं. देवाब्राह्मणांचे आशीर्वादाचें फल असेंच आहे. वरकड कारखानेजात येथील काम ज्यारी आहे त्यास, मोठी दौलत आहे तेथें इतकी सावधगिरी पाहिजेच. नवाबबहादूर करितात, हें फार चांगलें आहे. *सर्व सरंजाम इंग्रजाचे लढाई कामावर नवाबबहादर यांणीं न्यावा. रा। छ २९ सफर. हे विनंति.
पो। छ १९ रबिलावल, सन समानीन.