लेखांक ६२.
१७०१ माघ व. ७ श्री. २६ फे. १७८०.
पु।। राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. इकडील राजकी वर्तमानः- दादासाहेब सुरतेंतच आहेत. त्यांजकडून इंग्रज व कांहीं फौज येऊन डबई घेतल्याचा मजकूर पेशजीं लिहिलाच होता. त्यावर, राजश्री माहादजीराव सिंदे व होळकर व भारी तोफखानासुधां कोंडाईबारीचा घांट उतरोन पलिकडे खडकाबाहेरा येथें जाऊन पोहचले. तेथून सुरत वीस कोस आहे. इंग्रजांनीं डबई घेतल्यावर बडोद्यांत फत्तेसिंग गायकवाड यांचे कबिले होते, ते गायकवाड यांनी काढून, तेथून सिंदे यांजकडील पावागड कच्चे वीस कोस आहे तेथें गेले. सिंदे यांस व पायागडास तफावत पन्नास कोसांची आहे. इकडील भारी फौज गेली याजमुळें गायकवाड यांन्हीं हिम्मत चांगली धरली आहे व इंग्रजही आपले जागां अंदेशांत पडले आहेत. गायकवाड व सिंदे होळकर एक जाल्यावर लढाईही सुरू होईल. आज उद्यां वर्तमान येतांच मागाहून पाठविलें जाईल व आनंदराव यांस सांगोन नवाबबहादुरांस बातमी लेहून पाठऊं. इंग्रजास हरत-हेनें मैदानांत काढावें, याच तजविजेंत सिंदे होळकर आहेत. र।। छ २० सफर. हे विनंति.