लेखांक ५९.
८ फेब्रुआरी १७८०. श्री. १७०१ माघ शु॥ ३.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
पो। बाळाजी जनार्दन सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः- नवाबबसालत जंग बाहादर यांचे वकील पट्टणास आहेत, त्यांसी नवाबबाहदर पन्नास हजार होन मागतात, ह्मणोन कळलें. ऐसियास, त्या पासोन पैका घ्यावा, मग उपद्रव मना करावा, ऐसे करारांत नाहीं. आणि मुलकांतही कांही ताकत राहिली नाहीं. तमाम मारून ताराज जाला व वसूलही बहादरांकडील अमीलांनीं नेला. याज करितां पैक्याचें कांहीं ह्मणावें ऐसें नाहीं. मसलत मोठी आहे. यास्तव यासच अटकून लाख पन्नास हजारांवर नजर ठेवावी, ऐसें नाहीं. तुह्मीं व राजश्री नरसिंगराव व गोविंदराव नवाबबहादूर यांसीं बोलोन, ऐवजांचे कांहीं न ह्मणतां, कराराप्रमाणें अदवानीचा उपद्रव लौकर दूर व्हावा, हें जरूर करावें. बहादरांचें जाणें चेनापट्टणाकडे जलद घडावें. अलीकडे मुदगल तालुकियांत नवीन हांगामा बहादरांकडील अमीलांनीं शुरू केला, ह्मणोन कळलें. त्यास, नवाबबहादर यांसी एविशीं बोलोन, गजिंद्रगडकरी वगैरे यांस पत्रें द्यावीं कीं, मुदगल तालुकियास कोणेविशीं उपद्रव न देणें. जमेदार वगैरे कोणी तुह्मांकडे आल्यास, त्यास आश्रा न देणें. मुदगलकरांचेंच साहित्य करीत जाणें. ऐसीं निक्षूण पत्रें घेऊन, आधीं इकडे पाठवणें. याच शुतर स्वाराबरोबर पत्रें घेऊन पाठवावीं. सारांष, अमीरुलउमराव यांस पैक्याचें कांहीं न ह्मणतां, अदवानीचा उपद्रव दूर करवावा. थोड्यासाठीं वांकडें न दिसावें. विषयही कांहीं बहुत नाहीं. श्रीमंतांचे मर्जीकरितां अदवानीचा हांगामा दूर करून, अमीरुलउमराव यांसीं सलूखच करितों, ऐसें पेशजी नरसिंगराव यांस बहादरांनीं लिहिलें होतें, त्याप्रमाणेंच करावें. पैक्याविशीं कांहीं न ह्मणावें. हें सत्वर घडावें. *र॥ छ २ सफर. बहुत काय लिहिणे ? लोभ असो दीजे. हे विनंति.
पै॥ छ १७ सफर, सु॥ समानीन. गुरुवार.