लेखांक ५८.
१७०१ माघ शुक्ल २. श्री. ७ फेब्रुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:–विनंती उपरी. नवाब निजामआली खांबहादर यांचा व सरकारचा प्राचीन स्नेह. इंग्रजास तंबी कर्ण्याचे मसलतीस सर्वप्रकारें अनकूल, टोपीकरास तंबी करावी हे सर्वांची मसलत ठरली. त्याप्रमाणें आपलाले कामास लागावें, तें राहून, नवाबबहादूर यांणीं अदवानीसच जकड बसविली. सबब नवाब मवसूफ विच्यारांत पडले. मसलती होऊं लागल्या कीं, नामूस सर्वांस लागला. पुढें कसें करावें ? इंग्रजाकडून वकीलही भागानगरीं आहेच. राजकारणें चालूं लागलीं. तेव्हां इकडून खातरजमेनें लिहिलें कीं, वकील पट्टणास गेले. सर्वांची मसलत एक होऊन, टोपीकराची चाल खुषकींत फार जालीः त्यास तंबी करावी ऐसी जाली. तेव्हां अदवानीचा हांगामा नबाब बहादर, मना करवितात. आपण खातरजमेन असावें. ऐसें पक्कपणें दोन च्यार वेळां त्यांणीं निशा पडे ऐसें लिहिलें. तेव्हां त्यांचें उत्तर आलें कीं, अदवानीचा हांगामा मना होय, तोंपर्यंत आह्मीं सिकाकोलीकडे जात नाहीं. त्याउपरी आणखीं त्यांचीं पत्रें आलीं कीं, तुह्मी खातरजमा करून लिहितां, त्याप्रा। कांहींच अमलांत येत नाहीं. उलटें, मुदगल तालुकियास नवा उपसर्ग जाला. दिवसेंदिवस अधिक होतें. आह्मी, तुह्मीं खातरजमा करून लिहिलें, त्यावर स्वस्त. पुढें विचार काय ? ऐसीं लिहिलीं येतात. त्यावरून हालीं मुजरद सांडणीस्वार जोडी पाठविली आहे. तरी, तुह्मीं नवाबबहादर यांसी बोलोन, करारप्रा। आदवानीचा उपद्रव आधीं मना करवावा. आह्मीं खातरजमा करून नवाब निजामआलीखां यांस लिहिलें व लिहितों, त्याप्रों। घडावें. सारांष, केल्या करारांत अंतर न यावें. दिवसगत न लावितां, लिहिल्याप्रो। करून, उत्तरें जलद पाठवावीं. *रा। छ, सफर. हे विनंति.