लेखांक ५६.
१७०१ माघ शु।। २ श्री. ७ फेब्रुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. इंग्रज यांस सांप्रतकाळीं गर्व फार जाला. जात पक्की ........ संमंधाखेरीज समजत नाहीं. त्यास, पांच वर्षें त्यांस संमंध पडला, त्यावरून त्यांचे चालीस पक्केपणें माहीतगिरी जाली. कौलकरार इमान ज्यांचे गावींच नाहीं. प्रथम लिहिणें व बोलणें परम गोड. दुस-यास असें वाटावें कीं, काय इमान व वचन आहे, तें यापासीं. खरेपणाची रास, ऐसी भुलथाप पडावी. परिणामीं उमजतें. त्याची नजर केवळ वांकडी. सर्व मुलूक कबज्या केला. दक्षण चा दाइया राखितात ? एकास मिळऊन घ्यावें, एकास हालकें करावें, हे जात करण्याची. फोडाफोड करावी, नाद राखावा, ऐसें आहे. त्यास, दक्षण दोन लाख घोड्यांची विलायत. त्या गरीबांनीं काय कर्णें ? परंतु, न होण्याचे ते मनसबे करितात. दुसरें, ज्याचें इमान सुटलें, आणि वचनाची कायमता नाहीं, ते दौलत कांहीं एका दिवसांत बुडती, हा नेम. आणि, इश्वरें असें जाणूनच, होणाराप्रमाणें रावपंतप्रधान व नवाब निजामआलीखां व नवाबबहादर व भोंसले इतक्यांचा एका होऊन, ठाईं ठाईं त्यांस ताण बसवावे, ऐसें ठरविलें. त्यांतच त्यांची कंबक्ति आली हें समजावें. आणि, एक वेळ त्यांचा गरूर उतरल्याखेरीज दक्षणचा दाब व बंदोबस्त ही नाहीं. दौलत देणें हा यख्त्यार ईश्वराचा. तेव्हां ईश्वराचे आज्ञेप्रमाणें एकवचनी इमान शाबूत ऐसें चालिल्यानें परिणाम. इतक्या गोष्टी टोपीकरांनीं सोडल्या, तेव्हां, त्यांचा सेवटच. तात्पर्य, बहादरांनीं आतां जलदीनें चेनापट्टणाकडे नमूद व्हावें; व नवाब सिकाकोलीकडे जातील. इकडील व भोसल्याकडील गुंता नाहींच. यांत मसलत तमाम होती. इतके दरजे नवाब बहादर यांचे ध्यानांत आहेच. बाजेवख्त इकडील अनभव इंग्रजाचा तुह्मीं सांगावा. ** * * * * * हीं पत्रें नवाबबहादर यांचीं राजश्री नरसिंगराव यांस येत होतीं. तेव्हां, हे दरजे त्याचे चित्तास पुर्ते नक्ष आहेतच. र॥ छ १ सफर, हे विनंति.