लेखांक ५५.
१७०१ माघ शुद्ध २ श्रीशंकर. ७ फेब्रुआरी १७८०.
चिरंजीव राजश्री तात्या यांसीः- आपाजी रघुनाथ आसीर्वाद उपरी. येथील कुशल ता। माघ शुध २ पर्यंत मु।। पुणें सुखरूप असों. विशेष. बहुत दिवस जाले, तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्षित असे. तरी सविस्तर लिहून पाठवावें. सातारां सर्व सुखरूप आहेत. आठ दिवस जाले, गणेशपंत यांचें पत्र आलें होतें. आपण ठिकाणीं पोहचल्याचें पत्र आलें नाहीं, याकरितां मार्गप्रतीक्षा. तरी सविस्तर अर्थ तपसिलें ल्याहावे. तेणेंकरून समाधान होईल. आह्मीं दोन तीन पत्रें तुह्मांकडे पा।.आथणीचे मुक्कामावरील पत्र आलें. त्याअलीकडे आलें नाहीं. याकरितां लि।। असे. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे, हे आसीर्वाद.