पौ छ ११ सफर. लेखांक ५४. १७०१ माघ शु॥ २.
सन समानीन गुरुवार. श्री. ७ फेब्रुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरी बल्लाळ स॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मांस जाऊन तीन महिने जाले. पट्टणास पावल्याचे उत्तर नाहीं. इकडून पत्राच्या रवानग्याही फार जाल्या. पावल्या न पावल्या हेंही समजेना. इंग्रजास तंबी कर्ण्याची मसलत मोठी. आदियाप कशास कांहीं ठिकाण नाहीं. इकडील सरकारच्या फौजा व गाईकवाड मिळोन टोपकरासीं लढाईची सुरुवात जाली. सिंदे होळकर, मातबर फौज बमय तोफखाना, गुजराथ प्रांतीं दरकूच गेले. भोंसले यांचा ही जमाव होऊन बंगाल्याचे सुमारे त्यांणीं कूच केलें. नवाब निजामअल्लीखांबहादर यांची सरंजामी सर्व जाली असतां, अदवानी करितां गुंतून राहिले. त्यांस, तुह्मीं नवाबबहादर यांसीं बोलोन, अदवानीचा उपद्रव दूर करविला असेल, नसला जालिया सत्वर होऊन, नवाबबाहदर यांचें जाणें करारप्रमाणें चेनापटणाकडे जलद घडावें. नवाब ही सिकाकोलीकडे जातील. सारांश, इंग्रजाची मसलत मोठी. दिवस थोडे राहिले. यांत ही सर्वांनीं नरगा एकच केल्यास काम तमाम होऊन नके फार होतील. इकडील नमूद होण्यांत गुंता नाहीं. जलदी आतां तिकडील व्हावी. सर्व विषय व टोपीकराची चाल नवाबबहादर यांचे ध्यानांत आहेच. तुह्मीं लिहिल्या अन्वयें बोलून करारप्रमाणें सर्व गोष्टी अमलांत यावा ( व्या ). सविस्तर श्रीमंत नानांनीं लिहिलें त्यावरून कळेल.
*इतक्या दिवसांत तुमचीं पत्रें आलीं असावीं. परंतु मार्गीं गळाटलीं कीं काय समजत नाहीं. मसलत मोठी. पैदरपै वर्तमान कळत असावें. याची तर्तूद या उपरी तरी करावी. अदवानीचा महसरा उठोन नवाबबहादरांचें जाणें चिनापट्टणाकडे होय, ती गोष्ट लौकर करावी. र॥ छ १ सफर बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.
राजश्री गोविंदराव व गणेशपंत स्वामींस सां। नमस्कार विनंति उपरी. येथून गेल्यास किती दिवस जाले, पत्र येत नाहीं. अदवानीकडील हंगामा मना होत नाहीं. अपूर्व आहे. अदवानीकडील महसरा लवकर उठोन कार्यास जावें. राजश्री नरसिंगराव यांस नमस्कार सांगावा. लोभ असों दीजे. हे विनंति.