लेखांक ५३.
१७०१ माघ शु॥ २ श्री. ७ फेब्रुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मांस जाऊन तीन महिने जाले. उपरांत इकडून च्यार पत्रांच्या रवानग्या जाल्या. परंतु पट्टणास पावल्याचें पत्रच नाहीं, हें काय ! राजकारणी काम, बोलणें होईल तेव्हां हो. परंतु, पावलियाचें तों पत्र यावें ! मसलत मोठी. दिवस सर्व गेले. गुजराथेंत सरकार फौजची गाईकवाड समेत इंग्रजाची लढाई शुरू जाली. सिंदे होळकर मातबर फोजेनसीं दरकूच गेले. इकडील गुंता नाहीं. भोंसलेही बंगाल्याचे सुमारें माहेरावर गेले. एक नवाबाचा गुंता अदवानी करितां जाला. त्यास, तुह्मीं नवाबबहादर यांसी बोलोन, अदवानीचा हांगामा मना करविला असेल. नसला केल्यास, आधीं हांगामा दूर करून, नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टणाकडे जलद व्हावें. करारप्रमाणें कारभार होऊन, तुमचें येणें लौकर घडावें. काम मोठें. दिवस फार जाले. नवाबांकडे नवाबबहादर यांचा पत्रांचा सिलसिला ही चालावा, हें जरूर करावें; ह्मणजे सर्व एकी. आणि दुषमानास दरज राजकारणास न राहतां, फार कामें निघतील. मसलतच तमाम होईल. थोडे कामाकरितां मोठे मसलतीस आळस करून, आपआपणांत नाखुसी आणणें योग्य नाहीं. सर्व ता। राजश्री नाना यांणीं लिहिलें त्यावरून कळेल. *कामाची जलदी लौकर असावी. र।। सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
पै।। छ १७ सफर, सन समानीन, गुरुवार.