लेखांक ५०.
श्रीशंकर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गणेशपंत केळकर स्वामी गोसावी यांसीं:-
सेवक कृष्णराव नारायण जोशी नमस्कार विनंति उपरी येथील कुशल तागाईत पौष मु।। श्रीरंगपट्टण जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेषः- आम्ही आलिया त॥ तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी ऐसें न करणें. सदैव आपले कडील वृत्त लिहून संतोषवित जावें. आह्मां कडील वर्तमान त॥ हरीहरचे मुक्कामहून पत्र प॥ होतें. त्या अलीकडे दरमजल छ १० मोहरमीं पट्टणा नजीक येतांच, नबाब साहेबांनीं राजश्री श्रीनिवासराव बरकी कि मातबर सरदार सामोरे पाठविलें. किल्ल्या नजीक कावेरी तीरीं आंबरांईत जागा करविली होती तेथें उतरविला. दुसरे रोजीं मेजमानीचें साहित्य सिधा वगैरे प॥ छ १२ मीनहूस भेटीस बोलाविले. त्यावरून च्यार घटका रात्रीस मंडळीसह भेटीस गेलों. भेट जाहली. परस्परें उपच्यारीक भाषणें बहुत जाहलीं. नंतर च्यार घटका दरबारीं राहून निरोप दिला. त्यावरी मागतीं एक वेळ दरबारास गेलों होतों. या उपर सरकार-कार्याचे अर्थ बोलण्यांत येतील. होईल वर्तमान तें मागाहून लिहून पो।. आह्मांविसीं चिंता न करणें. शिवरात्रीस येणें होतां दिसत नाहीं. याहीवर श्री सांबजीची इच्छा ! घडेल तें खरें. नबाब साहेब बहुत कृपा करितात. मंडळीसह सर्व कुशल आहों. या प्र॥ मातुश्रीस व सर्वांस इष्ट मैत्रांस नमस्कार व लिखितार्थ सांगणें. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति. सेवेसीं बाळाजी दत्तात्रय व गोपाळ गणेश साष्टांग नमस्कार ली।। परिसोन, कृपा लोभ पत्रीं संतोषवीत जावा. हे विनंति.
पैवस्ती शके १७०१, विकारी संवत्छरे, माघ वद्य ३ मंगळवार, सायंकाळ.